वसई : वसईत एका खासगी शिकविणी घेणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी तीन जणांविरोधात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी वसई पश्चिमेला राहते. ती एव्हरशाईन येथे खासगी शिक्षकाच्या घरी शिकवणीसाठी जात होती. आरोपी जयदीप मकवाना याने पीडित मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी कुणाकडे वाच्यता न करण्याबाबत धमकी दिली होती.
हेही वाचा : खून केला पोराने, तुरुंगात गेले आई-बाप; १४ वर्षाच्या मुलाने केलेल्या हत्येचे प्रताप
पीडित मुलीने हा प्रकार शिक्षकाच्या कुटुंबियांना सांगितला. मात्र त्याची पत्नी रमा आणि वडील नटरवलाल मकवाना यांनी उलट या मुलीलाच धमकावले. या प्रकारानंतर मुलीला मानसिक धक्का बसला. शेवटी बुधवारी तिने कुटुंबियांच्या मदतीने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.