वसई : नायगाव उड्डाणपुलाच्या बंद अवस्थेत असलेल्या मार्गिकेला तडे गेले आहेत. दिवसेंदिवस हे तडे अधिक मोठे होत असून त्याखाली असलेली खडी सुद्धा आता खाली पडू लागली आहे. त्यामुळे ही मार्गिका खुली होण्यापूर्वीच धोकादायक बनू लागली आहे. नायगाव पूर्व पश्चिमेच्या भागात जोडण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उड्डाणपूल बांधला आहे. वर्षभरापूर्वीच हा पूल वाहतुकीला सुरू केला आहे. उड्डाणपूलामुळे वसई-विरार ते मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे येथून प्रवाशांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भविष्यात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी या पुलाला जोडून नायगाव कोळीवाडा या दिशेने जाणारी मार्गिका तयार केली आहे.
परंतु ही मार्गिका अजूनही खुली केली नसून या मार्गिकेला मध्य भागात तडे गेले असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस हे तडे अधिकच वाढत असून ही मार्गिका जीर्ण होऊ लागली आहे. तडे गेलेल्या ठिकाणाहून पूल तयार करताना टाकण्यात आलेली खडी व इतर मटेरियल सुद्धा खाली पडू लागले आहे. जर हा प्रकार असाच सुरू राहीला तर ही मार्गिका अधिक धोकादायक होऊन खचून जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गिकेची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा : महामार्गावरील ब्लॅक स्पॉट शून्यावर; दहिसर ते विरार फाट्यापर्यंत मागील तीन वर्षात एकही ब्लॅक स्पॉट नाही
काम निकृष्ट दर्जाचे ?
पुलाचे काम पूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अवघ्या दीड वर्षातच पुलाच्या मार्गिकेची अशी दयनीय अवस्था होत असल्याने या पुलाच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही मार्गिका अजून वाहनांच्या ये जा करण्यासाठी खुलीच झाली नाही. त्यापूर्वीच तडे गेल्याने हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा : पालघर जिल्ह्यात रक्तटंचाई जिल्ह्यात ९ पैकी २ रक्तपेढीत रक्त उपलब्ध
पुलावर सीसीटीव्हीची नजर
बंदमार्गिकेवर आता मद्यपींचा वावर अधिक प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या सुमारास काही गर्दुल्ले पुलावरच मद्यपान करण्यासाठी बसतात. काही वेळा सोबत आणलेल्या मद्याच्या बाटल्या फोडून त्या ठिकाणी टाकतात तर इतर कचरा टाकणे लघुशंका करणे अशा प्रकारामुळे पुलावर कचऱ्याचे साम्राज्य तयार होत आहे. तर दुसरीकडे इतर गैरप्रकार सुद्धा या पुलावर घडतात यावर लक्ष ठेवण्यासाठी पुलावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.असे असताना सुद्धा पुलावर गैरप्रकार सुरूच आहेत.