वसई : दहा वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही नायगाव सोपारा खाडीवरील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चढउतार करून प्रवास करावा लागत आहे. नायगाव स्थानकावर जाण्यासाठी खाडी पुलावर नवीन पूल तयार करण्याचे काम २०१४ मध्ये हाती घेण्यात आले होते. यासाठी जवळपास ४ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या अडचणींमुळे रखडले होते. केवळ एका बाजूच्या उतार मार्गाचे काम पूर्ण करून हा पूल खुला केला होता. परंतु दुसऱ्या बाजूच्या उतार मार्गाचे काम सुरू असताना खाडीच्या दलदलीमुळे डिसेंबर २०२० एका बाजूला भाग खचला होता. त्यामुळे या पुलाच्या बांधकामावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे पुन्हा सर्वेक्षण, उतार मार्गात दलदल असल्याने त्याचे माती परीक्षण ही करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानुसार उर्वरित कामासाठी नवीन आराखडा तयार केला असून हा पूल ४६ मीटरने वाढीविला जाणार आहे. यासाठी अंदाजे साडेसहा कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मात्र आता ज्या भागात पुढील काम होणार आहे ती जागा खारभूमी, खासगी मालकीची असल्याचा दावा करण्यात आला असून आता हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. सद्यस्थितीत या कामाला न्यायालयाने ही स्थगिती दिली असल्याने पुढील काम पूर्ण करता येत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.खाडी पूल तयार करण्याचे काम सुरू होऊन दहा वर्षे झाली तरीही पुलाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज एका बाजूने प्रवास करताना नागरिकांना जिने चढ उतार करून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अपंग नागरिक यांची चांगलीच दमछाक होत आहे. या पुलाच्या संदर्भात शासन स्तरावरून योग्य तो तोडगा काढून पुलाचे काम मार्गी लावावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

हेही वाचा : खरा चोर कोण….? एका विचित्र चोरीचा नाट्यमय तपास

शिवसेना ( ठाकरे गटाचे ) आंदोलन

नायगाव खाडी पुलाचे काम मार्गी लागत नसल्याने नायगाव पूर्वेच्या शिवसेना (ठाकरे गट) शाखाप्रमुख मंगेश चव्हाण, उपशहरप्रमुख सुरेश भोगले व शिवसैनिकानी नायगाव येथे दोन दिवसीय धरणे आंदोलन करीत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.आज सर्वसामान्य नागरिकांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाही या पुलाच्या कामात निर्माण झालेल्या अडचणीतून तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे. ज्या जागेतून हा पूल जातो त्यांच्या अडचणी दूर करून पुढील काम तात्काळ सुरू करावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी यावेळी केली आहे. या आंदोलनाला बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती कन्हैया भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

नायगाव खाडी पुलाच्या कामाच्या संदर्भात प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्या ठिकाणी पाठपुरावा सुरूच आहे. याशिवाय नवीन काही मार्ग काढून हा पूल तयार करता येईल का याचा ही विचार सुरू आहे.

संजय यादव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai naigaon khadi bridge work incomplete since last ten years due to case pending in court css