वसई : मराठी माणसाने उद्योजक बनण्याची मानसिकता ठेवावी, त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करायला मी तयार आहे, असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. विरार येथे आयोजित १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जागतिक मराठी अकादमीतर्फे विरारमध्ये “१९ वे जागतिक मराठी संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सकाळच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याशी मैत्री असल्याने संमेलनाला १० मिनिटे आधी आलो असे त्यांनी सांगितले. जागतिक मराठी परिषदेने मराठी माणसाच्या प्रगतीची दिशा ठरवावी, नियोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जपान, अमेरिका ,चीन या देशांच्या तोडीने येण्यासाठी तंत्र आत्मसात करा आणि उद्योग उभारा, असे ते म्हणाले. प्रगतीचे मार्ग माझ्या हातात आहेत, मी तुम्हाला सर्व सहकार्य करायला तयार आहे, असेही ते म्हणाले. साहित्यिकांनी मनाला साहित्य देणारे साहित्य लिहावे, कुणाचं मन दुखावणारे साहित्य लिहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : नालासोपार्यात भरदुपारी तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या
मी चित्रपट पहात नाही, भरपूर वाचन करतो
यावेळी राणे यांनी आपल्या साहित्याच्या आवडीबद्दल सांगितले. मी चित्रपट पहात नाही मात्र भरपूर वाचन करतो, असे ते म्हणाले. आमदार हितेंद्र ठाकूर यांचे विवा चॅरिटेबल ट्रस्ट तसेच साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या सहविद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांना “जागतिक मराठी भूषण सन्मान-२०२४” तर ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.