वसई : पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांचे ९ महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात नियुक्त होणार आहेत. यामुळे पोलीस ठाण्यांचे बळ वाढणार आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयााची स्थापना २०२० मध्ये झाली होती. ३ परिमंडळे असून १७ पोलीस ठाणे आहेत. याशिवाय ३ वाहतूक पोलीस विभाग तसेच गुन्हे शाखांच्या विविध शाखा आहेत. परंतु, या पोलीस ठाण्यांमध्ये अपुरे पोलीस बळ असल्याने काम करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. नवीन पोलिसांच्या नियुक्तीसाठी मागील वर्षी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. एकूण ९९६ पदांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात आली होती.
त्यासाठी ७४ हजार ४५८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. हे ९ महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता या सर्व पोलिसांची नियुक्ती विविध पोलीस ठाण्यात केली जाणार आहे. पोलीस भरतीमुळे गेल्या काही वर्षांपासून भेडसावत असणार्या अपुर्या मनुष्यबळाची अडचण दूर होणार आहे. साधारण प्रत्येक पोलीस ठाण्यात आवश्यकतेनुसार २५ ते ३० पोलीस कर्मचारी वाढणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, गुन्हे शाखा आदी ठिकाणी हे पोलीस नियुक्त केले जाणार आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था, तपास आदी कामे अधिक चांगल्या प्रकारे करता येतील असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : विरारच्या विवा महाविद्यालयातील घटना; ५ व्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे पोलिसांवर मोठा ताण पडणार आहे. नवीन पोलिसांच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्यांना दिलासा मिळाला आहे. आयुक्तालयातील विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून बोळींज पोलीस ठाणे प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने हे पोलीस ठाणे तयार करता येत नव्हते. आता मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने या बोळींज पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा मार्गही मोकळा झाला आहे. “पोलीस भरतीमध्ये पात्र उमेदवारांचे ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत हे सर्व पोलीस विविध पोलीस ठाण्यात रुजू होणार आहेत”, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी सांगितले.