वसई : दिवाळीत बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकरी गुरांना सजवून त्यांना पेंढ्याच्या आगीवरून उडवायची प्रथा अजूनही कायम आहे. मंगळवारी वसईत विविध ठिकाणच्या भागात शेतकऱ्यांनी पहाटे आगीवरून गुरा-ढोरांना उडवत बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. वसई विरार शहराचे शहरीकरण वाढत असले तरी आजही ग्रामीण भागात विविध प्रकारचे सण उत्सव हे पारंपारीक पद्धतीने साजरे केले जात आहे. विशेषतः दिवाळीच्या सणात येणारी बलिप्रतिपदा ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे.
वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात आजही शेतकरी आपल्या गुरा-ढोरांना बलीप्रतिपदेच्या दिवशी पहाटे लवकर उठून बैलांना स्वच्छ आंघोळ घालतात. त्यानंतर शिंगांना रंग, फुगे बांधून, फुलांच्या माळा याशिवाय त्यांच्या अंगावर गेरू आणि पांढऱ्या रंगाचे हाताच्या पंजाने ठसे उमटवले जातात. तसेच रंगेबरंगी झालर बैलांच्या अंगावर टाकून त्यांना सजवले जाते. या सजवलेल्या बैलांना आरती ओवाळून औक्षण करून पूजन केले जाते.
हेही वाचा : प्रदूषण रोखण्यासाठी अवजड वाहनांना बंदी; नागरिकांनी अडविल्या गाड्या
त्यानंतर रस्त्यावर व घरांच्या अंगणात पेंढ्याला आग लावून गुरे ढोरे ही एका बाजू कडून दुसऱ्या बाजूकडे उडविली जातात. मंगळवारी वसई विरारच्या शीरसाड, शीरवली, पारोळ, कामण, शिरगाव , कोपरी यासह अन्य ग्रामीण भागात पहाटे आगीवरून गुरा-ढोरांना उडवत बलिप्रतिपदा साजरी करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
हेही वाचा : वसई: मुलाची खेळणी काढायला छतावर चढला; वीजेच्या धक्क्याने पित्याचा मृत्यू
पेंढ्याची आग करून त्या वरून गुरांना उडवतात, ही आग पेंढ्याची असल्याने सौम्य असते. अनेकदा गुरांच्या अंगाला पिसवा, गोचिड चिटकलेल्या असतात. त्यांच्या अंगावरील जंतू धुरामुळे गळून पडतात. याशिवाय अनेकदा गुरे ही रानात चरण्यासाठी जातात अशा वेळी रानात वणवा पेटल्यास गुरे सैरभैर होत नाहीत. त्यामुळे बलिप्रतिपदेला त्यांना आगीवरून उडवून एक प्रकारे भीती दूर केली जाते असे जाणकार नागरिक सांगत आहेत.