वसई : चांदनी साह या ८ वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या करणार्या १४ वर्षीय मुलाचे आई-बापही आता तुरुंगात गेले आहे. मुलाने केलेली हत्या लपविण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. वसई पूर्वेतील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या चांदनी साह या ८ वर्षाच्या मुलीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. ती शुक्रवार १ डिसेंबर पासून बेपत्ता होती. सोमवार ४ डिेसेंबर रोजी तिचा मृतदेह घराजवळील एका खोलीत आढळला होता. याच परिसरात राहणार्या १४ वर्षीय मुलाने चांदनीची गळा दाबून हत्या केली होती.
मुलाचे आई वडील संध्याकाळी कामावरून घरात आल्यानंतर मुलीचा मृतदेह दिसला. त्यांनी मुलाला जालना येथे मावशीच्या घरी पाठवून दिले आणि मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला होता. नंतर त्याची दुर्गंघी येऊ लागल्याने तो चाळीतील एका रिकाम्या खोलीत नेऊन टाकला होता. दरम्यान, बेपत्ता चांदनीचा सर्वत्र शोध सुरू असताना आरोपी मुलाचे आई-वडील देखील शोध घेण्याचे नाटक करत होते. या परिसरात कुठलेच सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. परंतु आरोपी मुलाच्या घराबाहेर चांदनीची चप्पल सापडली होती. त्याआधारे पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला.
हेही वाचा : वसईतील गावे वगळण्याच्या प्रकरणाला नवी कलाटणी, गावे महापालिकेत ठेवण्याची शासनाची भूमिका
…म्हणून केली हत्या
आरोपी मुलाने हत्या का केली त्याचे अधिकृत कारण अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही. मात्र मुलाला अश्लील चित्रफिती बघण्याचे व्यसन होते. त्यामुळे मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने त्याने घरात बोलावले असावे. या प्रयत्नात त्याने तिची गळा दाबून हत्या केली असण्याची एक शक्यता वर्तविण्यात येत आहे. वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतर या गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. आम्ही विविध शक्यता पडताळून तपास करत आहोत अशी माहिती उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.