वसई : घरी येऊन धर्माचा प्रसार करणार्या दोन जणांविरोधात भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धर्मप्रसार करताना हिंदू धर्माविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही धर्मप्रसारक घरोघरी जाऊन विशिष्ट धर्माचा प्रसार करत असतात. त्यासाठी धार्मिक पुस्तकांचे वाटप करत असतात. भाईंदरच्या जेसल पार्क येथील एंजल सोसायटीत राहणार्या मनोजकुमार मिश्रा (४४) यांच्या घरी गुरूवारी डेव्हीड रेड्डी आणि सीरज राजवंशी हे दोघेजण आले होते.
त्यांनी विशिष्ट धर्माबाबत माहिती देऊन त्या धर्माचे आचरण करण्याची विनंती केली. मात्र ते करताना त्यांनी हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने केली. या प्रकरणी मिश्रा यांनी दोघांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी दोघांविरोधात कलम २९५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.