वसई : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी मीरा भाईंदर, वसई विरारच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ५० लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रकमेतील १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना एका पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. मात्र आर्थिक गुन्हे शाखेचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार फरार झाला आहे.
या प्रकरणातील फिर्यादीवर आर्थिक शाखेमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच मदत मिळवून देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार याने ५० लाखांची मागणी केली होती. तडजोडीनंतर रक्कम ३५ लाखांवर ठरवण्यात आली. यानंतर फिर्यादीने ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा : राज्य शासनाने भूमिका बदलली, वसईकरांमध्ये संताप; वसई विरार महापालिकेत २९ गावे कायम ठेवणार
या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस आयुक्तालयात सापळा लावला होता. लाचेच्या रकमेतील पंधरा लाखांचा पहिला हप्ता घेताना भाईंदर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गणेश वणवे याला रंगेहात अटक करण्यात आली. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार हा फरार झाला आहे. या प्रकरणात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.