वसई : गुन्हे शाखा २ च्या पथकाने वसईतील एका इमारतीत छापा टाकून तब्बल ११ कोटी ५८ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. बनवाट पारपत्राच्या आधारे तो वास्तव्य करत होता. या वर्षातील ही पोलीस आयुक्तालयातील अमलीपदार्थाविरोधातील सर्वात मोठी कामगिरी आहे.
वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथील महेश अपार्टमेंटमधे एक नायजेरियन इसम अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा २ चे पोलीस हवालदार सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील घराची तापसणी केली असता एक चावी मिळाली. त्या चावीने चौथ्या मजल्यावरील घर उघडले आणि अमली पदार्थांचा मोठा साठा हाती लागला. तेथे २२ किलो ८६५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) तसेच ४८ ग्रॅम कोकेन हे अमली पदार्थ आढळले. या अमली पदार्थांची किंमत ११ कोटी ५८ लाख ४१ हजार रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी व्हिक्टर ओडिचिम्मा ओनुवाला (३८) याला अटक केली आहे. त्याच्या घरात ईग्वेनुबा लेगॉस या इमसाचे पारपत्र (पासपोर्ट) सापडले. तो देखील व्हिक्टर बरोबर गुन्ह्यात आरोपी आहे. मात्र तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपींविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ॲक्ट) कलम ८ (क) २१,२२, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट पारपत्र, सिनेमात काम, पिळदार शरीरयष्टी
आरोपी व्हिकटर हा मागील १० वर्षांपासून नालासोपारा येथे वास्तव्य करत आहे. २०२४ मध्ये त्याच्याविरोधात मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रकरणात (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल आहे. त्याचे पारपत्र जप्त करण्यात आले होते. त्याने डाईक रेमंड या नावाने बनावट पारपत्र बनवून घेतले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी दिली. व्हिकटर याने काही सिनेमा आणि टिव्ही मालिकेत काम केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलीस त्याचा दावा तपासत आहेत. या घरातून तो अमली पदार्थांची छुप्या पध्दतीने विक्री करत होता. तो हे अमली पदार्थ कसे आणि कुठून आणत होता? तो कुणाला विकत होता त्याचा आम्ही शोध घेत असल्याचे पोलीस उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्क (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहीरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, मुकेश पवार, रवींद्र पवार, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, राजाराम काळे, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, प्रशांतकुमार ठाकूर, अनिल साबळे, अजित मैड, प्रतीक गोडगे, राजकुमार गायकवाड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.