वसई : शहरात दहशत माजविणारा विकृत (सिरियल रेपिस्ट) ची अटक, धावत्या दुचाकीवरून सोनसाखळी चोरणार्याची अटक, कुठलाही दुवा नसताना केलेला भाईंदर मधील हत्येचा उलगडा आणि अमली पदार्थ विरोधी कारवाई फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपास ठरले आहेत. दर महिन्याला उत्कृष्ट तपास करणार्या पोलिसांना उत्कृष्ट तपास (बेस्ट डिटेक्शन) चा पुरस्कार देऊन पोलीस आयुक्तांतर्फे सन्मानित करण्यात येते.
नुकतेच मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील फेब्रुवारी महिन्यातील उत्कृष्ट तपास करणार्या पोलिसांना आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गुन्हे शाखा २ आणि ३, मध्यवर्ती गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा तसेच नवघर, काशिमिरा आणि विरार पोलीस हे फेब्रुवारी महिन्यातील फेब्रुवारी महिन्याचे उत्कृष्ट तपासाचे मानकरी ठरले आहेत.
हेही वाचा : प्रदूषण रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार;पालघरमध्ये एलएनजी बसेस धावणार
गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी
नालासोपारा मध्ये एका विकृताने (सिरियल रेपिस्ट) ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या सिरियल रेपिस्टची प्रचंड दहशत शहरात पसरली होती. गुन्हे शानखा २ चे प्रमुख पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे आणि त्यांच्या पथकाने कसलाही दुवा नसताना अथक परिश्रम करून सीसीटीव्हीच्या आधारे तसेच इतर तांत्रिक तपास करून आरोपीचा माग काढला आणि आरोपीला सुरत येथून अटक केली. या कामगिरीबद्दल शाहूराज रणावरे यांना गौरविण्यात आले. २५ जानेवारी रोजी विरार मध्ये दुचाकीवरून जाणार्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्यात आले होते. विशेष म्हणजे दुचाकीवरून आलेल्या इसमानेच धावत्या दुचाकीवरून ही चोरी केली होती. सोनसाखळी चोरीचा हा जोखमीचा आणि नवा प्रकार होता. याप्रकरणी गुन्हे शाखा ३ च्या पथकाने सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून तलासरी येथून अमित शनवार (२८) या तरुणाला अटक केली. त्याने विरार, नालासोपारा तसेच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केलेले सोनसाखळी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखा ३ च्या पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना ‘उत्कृष्ट तपास क्रमांक १’ चा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा : रेल्वे मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली; मिरा रोड रेल्वे स्थानाकावरील घटना
हत्येचा उलगडा नवघर पोलिसांना पुरस्कार
५ फेब्रुवारी रोजी भाईंदर येथे चोरीच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह बीपी रोड येथील मृतदेह शौचालयात आढळला होता. नवघर पोलिसांनी कसलाही दुवा नसताना सीसीटीव्हीच्या आधारे ६ तासांच्या आता हत्या करणार्या चौघांना अटक केली होती. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांना गुन्ह्याची ‘उत्कृष्ट उकल क्रमांक ३’ चा पुरस्कार देण्यात आला. मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि काशिमिरा पोलिसांनी रिक्षा आणि मोटारसायकल चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीकडून ११ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले होते. याप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख आणि काशिमिरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना उत्कृष्ट उकल क्रमांक ४ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हेही वाचा : शहरबात :…तेव्हा सुद्धा प्रतिमा मलिन होत नाही का?
अमली पदार्थ विरोधी कारवाई ठरली गौरवास्पद
गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने कारवाई करून सुमारे सव्वा दोन कोटींचे चरस हे अमली पदार्थ जप्त केले होते. याप्रकऱणी चौघांना अटक करण्यात आली होती. तसेच विरार पोलिसांनी २ लाखांचा गांजा हा अमलली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या कारवाईसाठी अमली पदार्थ विरोधी शाखेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमर मराठे आणि विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना सर्वोत्कृष्ट उकल क्रमांक ५ आणि ६ ने सन्मानित कऱण्यात आले