वसई : कल्याण येथील मैत्रकुल जीवन विकास संस्थेचे संस्थापक किशोर जगताप यांच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात एका तरुणीने विनयभंग केल्याची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या पडघा पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे. संस्थेच्या सदस्यांनी मात्र असे आरोप षडयंत्राचा भाग असून फेटाळून लावले आहेत.
सामाजिक चळवळ आणि लोकसहभागातून मैत्रकुल संस्थेचा शिक्षणाचा उपक्रम राबवला जात आहे. किशोर जगताप यांनी ही संस्था स्थापन केली आहे. त्यांच्याविरोधात संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने लैंगिक छळ केल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे. सध्या ही पीडित तरुणी २३ वर्षांची असून ती १७ वर्षांची असताना संस्थेत जगताप यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ऑगस्ट २०१७ ते जानेवारी २०२१ या काळात ती कल्याण येथील मैत्रीकुल जीवन विकास या संस्थेत काम करत होती. या काळात मी अल्पवयीन असताना देखील संस्थेचे संस्थापक किशोर जगताप यांनी वेळोवेळी माझा विनयभंग केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : तीर्था पुन पूर्ण मॅरेथॉनचा विजेता तर प्राजक्ता गोडबोले व एमडी नूरहसन अर्ध मॅरेथॉन विजेते
याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विरार पोलिसांनी किशोर जगताप यांच्या विरोधात विनयभंगाचे कलम ३५४, ३५४ (अ) यासंह बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ८,१०,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने पोलिसांनी गुन्हा पडघा येथे वर्ग केला आहे.
हेही वाचा : ‘नोकरी घालवून रस्त्यावर आणू…’, वसईतील अनेक पोलीस अधिकार्यांना कर्ज वसुली एजंटच्या धमक्या
या संदर्भात संस्थेचे संस्थापक किशोर जगताप यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र संस्थेच्या सदस्यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. असे आरोप हे संस्थेला बदनाम करण्याच कट आहे. पीडित तरुणी मे २०२३ पर्यंत संस्थेत होती. मग तिने आताच तक्रार का केली असा सवाल संस्थेच्या एका महिला सदस्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना केला आहे. किशोर जगताप यांचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.