वसई: रिलस्टार असलेल्या एका तरुणीच्या घरातील खिडकीच्या काचेवर एक निनावी पत्र चिकटविण्यात येतं.. पत्र वाचताच तिच्या पायाखालची वाळू सरकते…अश्लील छायाचित्रांच्या आधारे या तरुणीला ब्लॅकमेल करण्यात आलेलं असतं…कुणी केलं? कसं केलं? असे अनेक प्रश्न गूढ निर्माण करतात…पण माणिकपूर पोलीस तांत्रिक विश्लेषण करून या विकृताचा माग काढतात आणि हा विकृत नाट्यमयरित्या जाळ्यात अडकतो.
वसई पश्चिमेला राहणारी ३२ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत काम करते आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्मयावर रिल्स बनवत असते. तिचे व्हिडियो लोकप्रिय असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. ३० जानेवारी रोजी तिच्या खिडकीच्या काचेवर एक निनावी पत्र चिकटवलेले आढळले. ते पत्र वाचताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ‘तुझी अश्लील छायाचित्रे आणि व्हिडियो माझ्याकडे असून मला इन्स्टाग्रामवर संपर्क कर अन्यथा ते व्हिडियो व्हायरल करेन अशी धमकी त्या व्यक्तीने दिली होती. सोबत त्याने आपला इन्स्टाग्राम आयडी दिला होता. तिने त्या इन्स्टाग्राम आयडीवर संपर्क केला असता धमकी देणार्या व्यक्तीने या तरुणीची ३ अश्लील छायाचित्रे आणि व्हिडियो तिला पुराव्यादाखल पाठवले. ही छायाचित्रे केवळ ट्रेलर असून माझ्याकडे तुझी अनेक अश्लील व्हिडियो असल्याचे त्याने सांगितले. हा प्रकार थांबवायचा असल्यास मला तुझे आणखी अश्लील व्हिडियो पाठवावे लागतील असे त्याने सांगितले.
बेडरूमच्या खिडकीबाहेरून करायचा चित्रिकरण
तरूणी पहिल्या मजल्यावर राहते. तिच्या घराजवळ मोकळे मैदान आहे. रोज संध्याकाळी कामावरून आल्यावर ती आपल्या बेडरूमध्ये रिल्स बनवत असते. आरोपी तिच्या घराजवळ असलेल्या एका भींतीवरून पत्र्याच्या शेडवर चढायचा आणि काळोखात लपून तिचे कपडे बदलत असताना चित्रिकरण करत होता. घाबरलेल्या तरुणीने तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
…असा लावला सापळा
या विकृत व्यक्तीला पकडणे मोठे आव्हान होते. माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी या विकृताला पकडण्यासाठी एक योजना बनवली. या तरुणीला विकृताशी बोलायला सांगून जाळ्यात ओढायला सुरवात केली. दरम्यान पोलिसांनी त्याचा आयपी ॲड्रेस शोधून काढला. त्यावरून तांत्रिक तपास करून त्याचा मोबाईल क्रमांकही मिळवला. मग त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी पुढील सापळा लावला. त्या तरुणीने अश्लील फोटो देण्यासाठी वसईच्या एका मॅक्डोनाल्ड या कॅफेत त्याला बोलावलो. तो या सापळ्यात अलगद सापडला. तो कॅफेमध्ये येताच साध्या वेशात असलेल्या पाटील यांनी त्याला पकडले कैफ एहसान हाश्मी (२२) असे या तरुणाचे नाव असून तो वसईच्या दिवाणमान येथे राहतो. त्याचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला असून इन्स्टाग्राम कंपनीशी संपर्क करून त्या तरुणीची अश्लील छायाचित्रे कायमस्वरूपी हटविण्यात आली आहे. यामुळे तरुणीला मोठा दिलासा मिळाला आहे.