वसई: वसई विरार, पालघर जिल्ह्यात वाहनांना विशेष व आकर्षक वाहनक्रमांक घेण्याकडे वाहनधारकांचा कल वाढू लागला आहे. मागील पावणे दोन वर्षात ११ हजार २०१ वाहनधारकांनी आवडीचा वाहनक्रमांक घेतला आहे. या नोंदणी शुल्कातून ९ कोटी १ लाख रुपये इतका महसुल प्राप्त झाला आहे. मागील काही वर्षात वसई विरार भागात वाहन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनांवर आकर्षक व आवडीचा क्रमांक घेण्यावर वाहन धारक भर देऊ लागले आहेत. मागील काही वर्षांपासून आपल्या वाहनावर आवडीचा क्रमांक घेण्याकडे नागरिकांची अधिक पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. विशेषतः काका, मामा, दादा, वाढदिवसाच्या तारखेचा क्रमांक असेल त्या अनुषंगाने व काही जण शुभ क्रमांक यांचा यात समावेश आहे.

वसई विरार शहरातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात वाहन नोंदणीसाठी येणाऱ्या वाहनधारकांकडून आवडीचा असलेला क्रमांक मिळावा यासाठी मागणी वाढली आहे. हजारो ते लाखो रुपयांचे विशेष नोंदणी शुल्क भरून हे क्रमांक घेतले जात आहेत. यातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला महसूल मिळू लागला आहे. २०२३ मध्ये ६ हजार ६० इतक्या वाहनधारकांनी विशेष क्रमांक घेतला आहे. यातून ५.२५ कोटी तर २०२४ मध्ये ४ हजार १४१ वाहन धारकांनी विशेष वाहन क्रमांक घेतला आहे.

हेही वाचा : भाईंदर मधील लाईफलाईन रुग्णालयात गोंधळ, रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण

यातून ३.७६ कोटींचा महसूल मिळाला आहे. मागील पावणे दोन वर्षात ११ हजार २०१ इतक्या वाहनधारकांनी विशेष क्रमांक घेण्याला पसंती दिली असून त्यातून परिवहन विभागाच्या तिजोरीत ९ कोटींचा महसूल जमा झाला आहे. हल्ली विविध प्रकारची नवनवीन वाहने बाजारात येत आहेत. त्यामुळे त्याला साजेसा असा वाहन क्रमांक असला पाहिजे यामुळे अनेक वाहनधारकांचा आकर्षक व आवडीचा क्रमांक घेण्याकडे कल वाढत आहे.

विशेष वाहनक्रमांकाच्या दोन ते तीन पट वाढ

विशेष व वाहनक्रमांकाच्या नोंदणी शुल्कात दोन ते तीन पटीने वाढ झाली आहे. जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, भाग्य क्रमांक अशा बाबींमुळे निवडक क्रमांक आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरता आणण्याचा अनेक वाहनधारकांचा प्रयत्न असतो. काहींचा जुन्या नोंदणी क्रमांकाशी जोडलेल्या भावनिक मूल्यांमुळे तोच क्रमांक नव्या वाहनांना घेण्याचा आग्रह असतो. राज्यातील व्यापारी, उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी यांचा कल अधिक असतो. दुचाकींच्या ‘१’ क्रमांकासाठी एक लाख रुपये आणि मालिकेबाहेरील क्रमांकासाठी तीन लाख भरावे लागणार आहेत. यापूर्वी हा क्रमांक ५० हजार रुपये भरून आरक्षित करता येत होता. चारचाकी वाहनांच्या ०००९, ००९९, ९९९९ या आणि अशा क्रमांकासाठी दीड लाखावरून अडीच लाख रुपये आणि दुचाकी-तीनचाकी वाहनांसाठी २० हजारावरून ५० हजार शुल्कवाढ करण्यात आली आहे. ‘४९’ अतिरिक्त क्रमांकांसाठी, चारचाकी वाहनांसाठी ५० हजारांवरून ७०हजार रुपये आणि दुचाकी आणि तीन-चाकींसाठी १५ हजार रुपये वाढवण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

हेही वाचा : वसई: बलात्काराच्या तक्रारीनंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष फरार, पक्षाने केली पदावरून हकालपट्टी

वाहनधारक विशेष वाहन क्रमांकासाठी अधिक मागणी करीत आहे. त्यामुळे वर्षागणिक विशेष क्रमांक घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता नोंदणी शुल्क ही वाढले आहे.

प्रवीण बागडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई