वसई: माझ्यावर आजवर एकही केस नाही. परंतु वसई विरारच्या पाण्यासाठी मी आंदोलन करून पहिली केस घ्यायला तयार आहे, असे शर्मिला ठाकरे यांनी शासनाला ठणकावले. पुढील ५ दिवसांत जर वसई विरार शहराला पाणी दिलं नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू, असा इशारा त्यांनी दिला. वसई विरार महापालिकेवर पाण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी सरकारला हा इशारा दिला.
वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. यासाठी मनसेतर्फे शुक्रवारी वसई विरार महापालिकेवर महापालिकेवर मनसे तर्फे महामोर्चा काढण्यात आला होता. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
हेही वाचा : संकेतस्थळावर स्वस्त घराचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; दोन ठकसेनांना आचोळे पोलिसांकडून अटक
पंतप्रधानांनी काल दुसऱ्या शहरातील धरणाचे उद्घाटन केले. मात्र अद्याप वसई विरार शहराला पाणी दिलेले नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र वसईकर नागरिक तहानलेले आहेत. जुलै महिन्यापासून प्रत्येक वेळेला पाणी रोखून धरण्यात आलेले आहे. हे पाणी जर पुढील पाच दिवसात दिले नाही तर मी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि स्वतः पाणी सुरू करून असे शर्मिला ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.
हेही वाचा : धर्मप्रसारकांविरोधात गुन्हे दाखल, हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप
माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्यावर एकही केस नाही. मात्र वसई विरारच्या नागरिकांसाठी मी आंदोलन करून पहिली केस घेण्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. पाणी देण्यासाठी त्यांनी सरकारला ५ दिवसांची मुदत दिली आहे. मनसेच्या या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता