वसई : नालासोपारा येथील ४१ अधिकृत इमारतींवर कारवाईच्या विरोधात बुधवारी रहिवाशी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतलल्याने तणाव निर्माण झाला होता. अतिरिक्त पोलीस कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. यामुळे बुधवारी कारवाई करता आली नाही.
वसई विरार महापालिकेतर्फे नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू आहे. २३ जानेवारी पासून या कारवाईला सुरवात झाली आहे. आतापर्यंत पालिकेने १६ इमारती निष्काषित केल्या आहेत. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पालिकेचे पथक कारवाईसाठी गेले. मात्र इमारतींमधील रहिवाशी रस्त्यावर उतरून त्यांनी कारवाईला विरोध केला. आमचे पुनर्वसन करा अन्यथा आम्ही आत्मदहन करू असे सांगत रहिवाशांनी रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती चिघळून लागल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. वालीव, तुळींज, आचोळा, विरार पोलीस ठाण्याचे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि रस्ते बंद केले. यानंतर हलक्या पोलीस बळाचा वापर करून रहिवाशांना पांगविण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
हेही वाचा : वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
परिस्थिती नियंत्रणात
आता पर्यंत झालेल्या कारवाईत कुठलाही मोठा विरोध झाला नव्हता. मात्र काही संघटनांनी रहिवाशांंना खोटी माहिती देऊन संभ्रम निर्माण केल्याने ते रस्त्यावर विरोध करण्यासाठी उतरले होते. परंतु आम्ही सामोपचाराने त्यांची समजूत काढली, अशी माहिती पालिकेचे अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचे प्रमुख उपायुक्त दिपक सावंत यांनी दिली. घराच्या बदल्यात घर दिले जाते असे लोकांना सांगण्यात आले आहे. मात्र अनधिकृत बांधकाम असल्याने तसे करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई होत आहे, असे आम्ही लोकांना सांगितल्याचेही त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया कायदेशीर आहे हे सांगण्यासाठी पालिकेने पॅनवरील वकिलांना देखील घटनास्थळी आणले होते.