वसई : मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भाईंदरशाखेच्या भरोसा कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांना राज्य शासनाने बालसेन्ही पुरस्कार देऊन गौरविले आहे. लहान मुलांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे या भाईंदर येथील भरोसा कक्षाच्या प्रमुख आहेत. बालकांचे लैंगिक शोषण आणि इतर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘कायद्याचे धडे’ हा उपक्रम सुरू केला होता.या उपक्रमाअंतर्गत त्यांनी ७५ हून अधिक कार्यक्रम घेऊन ४० शाळांमधील २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्याच्या बाल व हक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास आयुक्ताल. आणि युनिसेफ यांच्या वतीने २०२३ या वर्षांचा ‘बालस्नेही’ हा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा : वसई : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे विकृत मोकाट, गुन्हे शाखेसह एकूण ५ पथकांमार्फत शोध सुरू
मुंबईतील यंशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बाल व हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुभीबेन शाह आणि महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिंदे यांनी भरोसा कक्षात काम करताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन वेळा पोलीस आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याचा पुरस्कार मिळाला आहे.