वसई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्याच्या विविध महापालिकेतील ३४ उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये वसई विरार मधील ५ उपायुक्तांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीमुळे निवडणूक आयोगाने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींच्या बदल्या करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी नगरविकास खात्याने ३४ अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये वसई विरार मघील ५ उपायुक्तांचा समावेश आहे.
हेही वाचा : विरारमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड, वसई-विरार दरम्यान लोकल ट्रेन बंद; प्रवाशांचे हाल
बदल्या झालेल्या अधिकार्यांमध्ये उपायुक्त डॉ चारूशिला पंडित (घनकचरा), उपायुक्त डॉ विजय द्वासे (परिमंडळ प्रमुख), उपायुक्त पंकज पाटील (क्रिडा), उपायुक्त तानाजी नरळे (पाणी पुरवठा) आणि उपायुक्त नयना ससाणे (वृक्ष प्राधिकरण) आदींचा समावेश आहे. या अधिकार्यांना तात्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नवीन नियुक्ती कुठे कऱण्यात आली आहे त्याचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. वसई विरार महापालिकेतून बदली करण्यात आलेल्या पाचही उपायुक्तांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यामुळे या बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी नवीन अधिकारी आल्यावर त्यांच्याकडे पदभार सोपवून हे अधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत.