वसई : वसईत राहणार्या एका १७ वर्षीय मुलीचे आणि तिच्या ७ वर्षांच्या लहान भावाचे १० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. नायगाव पोलिसांनी याप्रकऱणी ३ पथके तयार करून दोन आरोपींना अटक केली आणि या मुलांची सुखरूप सुटका केली. फिर्यादी यांचे नायगावमध्ये दुकान आहे. शनिवारी त्यांची १७ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाले होते. त्यांच्या सर्वत्र शोध सुरू असताना अचानक मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मुलं सुखरूप पाहिजे असतील तर १० लाख खंडणी द्यावी लागेल असे अपहरणकर्त्याने सांगितले. मुलांच्या वडिलांनी त्वरीत नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून खंडणी, अपहरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी ३ पथके तयार केली.
हेही वाचा : अनोळखी महिला आणि एक निनावी पत्र, सायबर भामट्यांची फसवणुकीची नवीन पद्धत
तांत्रिक विश्लेषण आणि तपास करून पोलिसांनी काशिमिरा येथून मुलीची तर याच परिसरातील अन्य एका इमारतीमधून मुलाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी जयप्रकाश उर्फ गंगाराम गुप्ता आणि विपुल तिवारी या दोघांना अटक केली. यातील आरोपी मुलीचा मित्र आहे. त्यामुळे मुलीचा या अपहरण नाट्यात सहभाग आहे का? त्याचा पोलीस तपास करत आहेत. नायगाव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांच्या पथकाने जलदगतीने तपास करून मुलांची सुखरूप सुटका केली आणि अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या