वसई: डॉक्टर असल्याचे भासवत दोन भामट्यांनी वसईतील काही महिलांना औषधांच्या नावाखाली गंडा घातला आहे. विशेष म्हणजे आशा सेविकांकडून त्यांनी ही माहिती मिळवली होती. याप्रकऱणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएससी) आहेत. या केंद्राच्या अंतर्गत आशा सेविका काम करतात. त्या घरोघरी जाऊन शासनाच्या आरोग्य मोहिमा राबवत असतात. २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान दोन इसमांनी पारोळ, भाताणे आणि शिवणसई प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका महिलांची भेट घेतली. आम्ही जिल्हा परिषद पालघर येथील डॉक्टर असल्याचे त्यांनी या आशा सेविकांना सांगितले. शासनाकडून व्यंधत्वावर उपचारासाठी औषधे आणल्याचे सांगून व्यंधत्व असलेल्या महिलांची माहिती मागितली. या आशा सेविका त्यांच्या भूलथापांना बळी पडल्या आणि त्यांनी काही महिलांची माहिती दिली. या भामट्या डॉक्टरांनी अशा महिलांची भेट घेऊन त्यांना संतान संजीवनी कल्पवटी चूर्ण पुडी, संभोग सम्राट कल्पवटी चूर्ण नावाच्या पुड्या १८ हजार रुपयांना विकल्या. नंतर ते डॉक्टर नसून भामटे असल्याचे लक्षात आले.
हेही वाचा : Dahi Handi 2024 Celebration : मिरा भाईंदर मधील गोपिका पथकात वाढ; मानवी मनोरे उभारण्यात महिला अग्रेसर
याप्रकरणी पारोळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संकेत हेगडे यांनी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मांडवी पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९(२), २०४, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.