वसई विरार : १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन आज येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चार शंकराचार्यांनी नकार दिला आहे. यावर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : “मराठी माणसाने उद्योजक बनण्याची मानसिकता ठेवावी”, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन
“राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, त्याचं कौतूक नाही. हा विषय आतापर्यंत कोणी घेतला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भाजपानी हा विषय हाती घेतला. शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी? शंकराचार्य हे आमच्या भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. राम मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नसून धार्मिक दृष्टिकोनातून होत आहे. राम आमचा दैवत आहे. त्यासाठी मंदिर उभारलं जातंय. शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातलं हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं, जे योगदान रामानी दिलं”, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राम मंदिराचे बांधकाम अपूर्ण असल्याने देशातील चार शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला. तर इतर दोन शंकराचार्यांनी अद्याप राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.