वसई: वसई विरारच्या पूर्वेच्या भागाला उन्हाळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सद्यस्थितीत पाण्याची अन्य कोणतीही सुविधा नसल्याने टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. पालिकेकडून प्रतिदिन २३ टँकरद्वारे या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. वसई विरार शहराला एमएमआरडीएच्या सूर्या योजनेतून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले असले तरीही पूर्वेच्या काही ठिकाणी अजूनही पालिकेच्या पाण्याच्या जलवाहिन्या पोहचल्या नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांची पाणी समस्या सुटली नाही.
दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते. बोअरवेल, विहीरी, तलाव या पाण्यावर आपली तहान भागविण्याचा प्रयत्न रहिवाशी करतात. मात्र उन्हाळ्यात या जलस्त्रोतांची पातळी खालावत असल्याने पाणी मिळण्यास अडचणी येतात. यात विशेषतः कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा, गीदराई पाडा, सातीवली, गोखीवरे, वैतरणा परिसर यांचा समावेश आहे. कामण परिसरातील गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे व माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी मागणी केली होती.
हेही वाचा : वसई: महामार्गावर छुप्या मार्गाने खैर तस्करी, भाताणे वनविभागाची कारवाई; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
सद्यस्थितीत पालिकेकडून वसई विरार मधील प्रभाग समिती जी मधील कामण परिसर, प्रभाग समिती एफ मधील पेल्हार व सी मधील वैतरणा परिसर अशा ठिकाणी प्रतिदिन २३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. टँकरचे येणारे पाणी मिळविण्यासाठी टाक्या, बादल्या घेऊन नागरिकांची झुंबड उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मे महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सूर्या प्रादेशिक प्रकल्पातून वसई विरार शहराला जवळपास १८५ दशलक्ष लीटर इतके पाणी उपलब्ध होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १०० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पालिकेचे ज्या भागात पाणी पोहचले नाही तेथे जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे, वितरण प्रणाली सुधारणे अशी कामे पूर्ण करून पूर्वच्या भागातील गावांना मे पर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे पालिकेने सांगितले आहे.
हेही वाचा : वसई विरार शहरात चार्जिंग केंद्र उभारणार
भूजल पातळी खालावली
वसई विरार शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी देखील अधिक प्रमाणात वाढत आहे. सुरवातीला कूपनलिका, विहिरी, तलाव अशा नैसर्गिक असलेल्या जलस्रोतावर पाणी सहज उपलब्ध होत होते. परंतु अनिर्बंध पाणी उपसा, सिमेंट काँक्रिटची तयार झालेली जंगले यामुळे शहरात जमिनीतील भूजल पातळी अक्षरशः रसातळाला गेली आहे. याशिवाय जे काही साठवणूक केलेला पाणीसाठा आहे तो सुद्धा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या भागात नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.