वसई: पालघरच्या विविध ठिकाणच्या आगारात कालाबाह्य व खीळ खिळ्या झालेल्या बसेस आता हटविल्या जाणार आहेत. यंदाच्या वर्षात जवळ ५० एसटी बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत. त्या जागी टप्प्या टप्प्याने नव्याने उपलब्ध होणाऱ्या बस गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे.

पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, सफाळे, जव्हार , पालघर असे महामंडळाचे आठ आगार आहेत. या आगारातून ग्रामीण, शहरी व इतर लांब व मध्यम पल्याच्या गाड्या सोडल्या जातात.यातून मोठ्या संख्येने प्रवासी करतात. सद्यस्थितीत सर्व आगारात मिळून ४३५ इतक्या एसटीच्या बसेस असून दिवसाला ३५० ते ३९० चइतक्या बसेस सोडल्या जातात. परंतु यातील काही एसटी बसेस जुन्या झाल्याने खीळ खिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे सुद्धा प्रवासा दरम्यान अडचणी येतात तर काही वेळा मध्येच तांत्रिक बिघाड होऊन ही बस बंद पडण्याच्या घटना, चाक निखळण्याच्या घटना घडत असतात. याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसतो.

पालघर जिल्ह्यातील एसटी आगारात ही बारा व पंधरा वर्षे उलटून गेलेल्या कालबाह्य झालेल्या बसेस आहेत. अशा बसेस मधून काही वेळा प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागतो. तर दुसरीकडे खीळ खिळ्या व भंगार अवस्थेत असलेल्या बस मधून प्रवास करतानाही अनेक अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा या जुन्या झालेल्या बसेसचा ब्रेक लागत नाही तर  घाटात वळण घेताना  बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. तर काही वेळा या बसेस मध्ये तांत्रिक अडचण निर्माण होऊन बस बंद पडतात अशा वेळी प्रवाशांचा सुद्धा खोळंबा होतो. याशिवाय चालक व वाहक यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. अशा जुन्या व कालबाह्य ठरलेल्या बसेस आता काढून टाकण्याचा निर्णय पालघर एसटी महामंडळाने घेतला आहे. या २०२५ या वर्षात सर्व आगारात मिळून जवळपास ५० कालबाह्य झालेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत. असे पालघर एसटी विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले.

प्रवाशांना चांगली सुविधा देण्यावर भर

पालघर जिल्ह्यातील आगारातून जे प्रवासी करतात त्यांना चांगली एसटीची सुविधा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. शहराचे वाढते नागरीकरण यासोबतच आता एसटी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्या वाढली असून दिवसाला सरासरी १ लाख १५ हजार इतके प्रवासी प्रवास करीत आहेत. यासाठी बसेस ची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आम्ही १२० नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शासनाकडे केली आहे. २० बसेस मिळाल्या आहेत. यात वसईत ५, जव्हार १० आणि पालघर ५ अशा प्रकारे देऊ केल्या आहेत. आणखीन बस उपलब्ध होतील त्या अन्य आगारात दिल्या जातील असे पालघर एसटी महामंडळ विभागाने सांगितले आहे.

नादुरुस्त बस मुळे अपघाताच्या घटना

२५ जुलै २०२४ रोजी वसई अर्नाळा मार्गावर प्रवास करताना वाघोली येथे ही एसटीचे चाक निखळल्याची घटना घडली होती. त्यातून २२ प्रवासी प्रवास करीत होते. १ फेब्रुवारी २०२५ वसई वज्रेश्वरी मार्गावर पारोळ येथे चालत्या एसटीचे चाक निखळले. बेरिंग तुटल्याने ही घटना घडली होती. यातून ३० प्रवासी प्रवास करीत होते.