विरार : पालिकेच्या परिवहन सेवेच्या मोफत प्रवासपास च्या नूतनीकरणाची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोफत बस पासची मुदत ३१ मार्च रोजी संपली होती. मात्र या सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना आपला पास नूतनीकरण त्वरित करणे शक्य होणार नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, नवीन ई-बस पालिकेच्या ताफ्यात येणार असून त्यामुळे फेर्‍यांमध्ये वाढ होणार असल्याचे पालिकेने सांगितले.

वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवेमार्फत महानगरपालिका हद्दीतील जेष्ठ नागरीक, दिव्यांग, कर्करोगपिडीत व रक्तशुध्दीकरण (डायलेसिस) करुन घेणारे नागरिकांकरिता ‘मोफत बस प्रवास योजना’ राबविण्यात येते. बहुजन विकास आघाडी सत्तेत असताना २०१९ साली हा निर्णय घेण्यात आला होता. सध्या २० हजार नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. ही सेवा ( पासची मुदत ) १ एप्रिल पासून सुरु होऊन ३१ मार्चला संपते. मात्र सेवा घेणाऱ्या नागरिकांना त्वरित मोफत पासचे नूतनीकरण शक्य होणार नव्हते. यासाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी पासचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. ही मागणी विचारात घेऊन आयुक्तांनी मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे.

नूतनीकरणासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे या सेवांचा लाभ घेणाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत असणाऱ्या जुन्या पासवर प्रवास करता येणार आहे. तसेच या सेवेचा लाभ २०२५- २०२६ या वित्तीय वर्षात घेण्यासाठी मुदतवाढीच्या कालावधीमध्ये नवीन अर्ज जवळच्या प्रभाग समिती कार्यलयामध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आता या सेवांचा लाभ घेणाऱ्या हजारो नागरिकांना मुदतवाढीत पासचे नूतनीकरण करून पुन्हा या सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. नवीन अर्ज भरून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.

नवीन ई-बस मुळे फेर्‍या वाढणार

वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागा कडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते ६५ हजार इतके प्रवासी प्रवास करतात. मात्र शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेने या बसेस सुद्धा अपुऱ्या पडत होत्या. काही ठिकाणच्या मार्गावर ही बसेस कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांची फारच गैरसोय होत लागली होती.यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून ई बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरवातीला ५७ ई बसेस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ४० ई बस पालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आता आणखीन नवीन १७ ई बसचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २० कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. लवकरच नवीन १७ ई बस पालिकेच्या ताफ्यात दाखलह होणार आहेत नवीन बस प्राप्त झाल्यावर त्या नवीन मार्गावर किंवा जेथे अजून बस सेवा सुरु नाही अशा मार्गावर परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली आहे.