वसई- रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेवर अंडी फेकण्यात आल्याने विरार मध्ये रविवारी रात्री निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी परिसरातील १५ सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यानंतर ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी परिस्थिती निवळली आहे. मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
विरार मध्ये सकल हिंदू समाजाद्वारे रविवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वेश्वर मंदिर चिखल डोंगरी ते पिंपळेश्वर मंदिर ग्लोबल सिटी असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दिडशे दुचाकी, रथ, २ टेम्पो अशी वाहने होती. शेकडोंच्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. चिखलडोंगरी येथून यात्रेला सुरवात झाली. रात्री ८ च्या सुमारास एकता पार्कजवळून शोभायात्रा जात असताना अज्ञात व्यक्तीने अंडी फेकली. यामुळे एकच खळबळ उडाली. बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
ही रॅली ग्लोबल सिटी येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात आली असता एका इमारतीजवळून अंडी फेकण्यात आली. शोभायात्रेतील ३ ते ४ बाईकस्वार हे मुख्य रॅलीतुन बाहेर जाऊन बाजूला असणाऱ्या गल्ली तून येत असताना कोणत्यातरी अज्ञात इसमाने वरून अंडे टाकून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून बोलिंज पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत यांनी दिली. सध्या तणाव निवळला असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बोळींज पोलिसांनी केले आहे.