वसई : वसई विरार महापालिकेचे माजी महापौर रुपेश जाधव यांना सक्तवसुली संचलनालयाने ७८० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकऱणी एक नोटीस बजावली असून ती सध्या सोशल मिडियावर वायरल झाली आहे. मात्र ही नोटीसच बनवाट असून मला किंवा माझ्या कंपनीला कुठलीच नोटीस आली नसल्याता दावा रुपेश जाधव यांनी केला आहे. या बनवाट नोटीस प्रसारीत केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
रुपेश जाधव हे वसई विरार महापालिकेचे माजी महापौर आहे. त्यांची गणेश वेंचर नावाची कंपनी आहे. या कंपनीचे संचालक रुपेश जाधव, मनोज चतुर्वेदी,गंगाराम मुकुंद आणि अनिश गीध या चौघांना सक्तवसुली संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नोटीस बजावली असून या नोटीसटी प्रतच समाज माध्यमावर वायरल झाली आहे.. ७८० कोटींचा मनी लॉंड्रीग प्रकरणात ही नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. चौकशीसाठी नवी दिल्ली येथे १५ दिवसात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे या नोटीस मध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण, आज उच्च न्यायालयात सुनावणी, निर्णय अपेक्षित
मात्र रुपेश जाधव यांनी ही नोटीसच बनावट असल्याचे म्हटले आहे. मला किंवा माझ्या सहकार्यांना कुठलीच नोटीस आलेली नाही. ज्या तक्रारदाराशी आमचा वाद आहे त्याने ही बनावट नोटीस तयार केली आहे. या प्रकरणी बदनामी केल्याबद्दल तसेच सक्तवसुली संचलनालयाची बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.