मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण आणि वसई विरार महापालिकेने वसई विरार झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी वसई विरारसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) राबविली जाणार आहे. यामुळे एक नियोजन बद्ध शहर निर्माण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. असे जरी असले तरी नव्याने अनधिकृत बांधकामे फोफावू लागली आहेत. या अनधिकृत वस्त्यांचे काय असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.

मागील काही वर्षात वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. विविध ठिकाणी भूमाफिया व चाळ माफिया सक्रिय झाल्याने मिळेल त्या मोकळ्या जागेत अनधिकृत चाळींचे साम्राज्य तयार होत आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती यामुळे अनेक जण  निवाऱ्यासाठी वसई-विरारमध्ये वसू लागले आहेत. त्यात स्वस्त घरे म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यातून येथे गर्दी दाखल होऊ लागली आहे. यातूनच अनधिकृत बांधकामाचे प्रमाण वाढू लागले आहे.  यात परप्रांतीयांनी आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. परिणामी  मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहू लागली. त्यात येणारी लोक कोण? त्यांची पार्श्वभूमी काय याचा कोणताही विचार केला जात नसल्याने शहरातील लोकसंख्या ही भरमसाठ वाढत आहे. हळूहळू वाढणारी ही संख्या स्थानिकांच्या मूलभूत सेवांमध्ये वाटेकरी होत आहेत. पाणी, वीज, रस्ते, गटारे, नोकरी, रहदारी, वाहतूक  अशा मूलभूत सेवांवर ताण येऊ लागला. यामुळे शहराच्या होणाऱ्या ओढाताणीत इतर सामान्य माणसे भरडली जात आहेत.

वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे येथील नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊन येथील निसर्ग संपदा  धोक्यात सापडू लागली आहे. एकेकाळी वसई विरार शहर हे मुंबईला स्वच्छ व शुद्ध हवा पुरविणारे फुफ्फुसे असल्याचे सांगितले जात होते. मात्र या अनधिकृत बांधकामांनी येथील निसर्ग सौंदर्य ओरबाडून नष्ट केले आहे.

अनधिकृत बांधकामामुळे शहरातील बकालपणा दिवसेंदिवस वाढू लागला आहे.  मिळेल त्या जागी कचरा टाकण्यापासून ते मलनिस्सारण ही रस्त्यावर सोडले जात आहे.अशा प्रकारामुळे शहर दिवसेंदिवस विद्रुप दिसू लागले आहे.याशिवाय नागरी आरोग्याच्या समस्या ही निर्माण होत आहेत.

अशा समस्या या अनधिकृत पणे नियोजन शून्य उभारण्यात येत असलेल्या बांधकामामुळे निर्माण होत आहेत. आता वाढत्या झोपड्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी व तेथील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्यात आली आहे. यात वसई विरार शहराचा समावेश आहे. आता ही योजना वसई विरार शहरात राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात २ लाख ३२ हजार इतक्या झोपड्या आहेत. महानगर क्षेत्रातील सर्वाधिक झोपड्या या वसई विरार शहरात वसलेल्या आहेत आणि अजूनही नव्याने तयार होत आहेत. यावरूनच शहरातील अनधिकृत बांधकामे किती जोरात सुरू आहे याचा अंदाज येत आहे.

झोपड्यांचा विकास झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून विकास केला जाणार आहे. शहराला झोपडपट्टी मुक्त करून एक नियोजन बद्ध शहर तयार करण्याचा पालिकेचा निर्धार आहे. 

त्यामुळे सर्वसामान्यांनी  पोटाला चिमटा काढून पै पै गोळा करून खरेदी केलेल्या झोपडीचे इमारतीमध्ये रुपांतर होऊन राहण्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरीही यातूनही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ही योजना २०११ पर्यंत लागू आहे. मात्र त्यानंतरही शहरात बेसुमार अनधिकृत बांधकामे होऊन झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे काय असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे 
एसआरए लागू होताच भूमाफिया सक्रिय होऊन झटपट अनधिकृत बांधकामे उभी करू लागले आहेत. स्वस्तात घर विक्री सारख्या जाहिराती करून ते सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक ही करू लागले आहेत. वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे शहराचे नियोजन पूर्णतः कोलमडून पडत आहे.

एकीकडे झोपड्यांचा विकास साधत असताना नव्याने उभी राहत असलेली अनधिकृत बांधकामे नियंत्रणासाठी महापालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र तसे कोणतेच प्रभावी  प्रयत्न होत नसल्याने येथील समस्या अधिकच जटिल बनू लागली आहे.

अनधिकृत बांधकामे तोडल्याचा दावा 

अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून तोडक कारवाई केली जात असल्याचा दावा केला जातो. मागील तीन वर्षात दीड कोटी चौरस फुटांचे अनधिकृत बांधकामे तोडली आहेत ३७५  गुन्हे ही दाखल केले आहेत. याशिवाय १ हजाराहून अधिक एमआरटीपीच्या नोटिसा दिल्या आहेत असा दावा महापालिकेने केला आहे.

गुन्हेगारांचे आश्रय स्थान 

शहरात उभी राहणारी अनधिकृत झोपड्या या सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा निवारा असला तरी दुसरीकडे याच अनधिकृत झोपड्यांचा आसरा घेत काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकं ही यात आश्रयाला येत आहेत. विशेषतः नालासोपारा हे शहर सर्वाधिक गर्दीचे आणि वाढत्या लोकसंख्येचे आहे. अनधिकृत बांधकामांमुळे नवनवीन वसाहती तयार होत असून परप्रांतियांचा मोठी लोकसंख्या वाढत आहे. सर्वाधिक गुन्हे याच भागात घडत असल्याचे अनेकदा पोलीस कारवायामधून समोर आले आहे.