वसई- वसई विरार शहरात विविध कामे सुरू असून त्यासाठी ठेकेदारांनी रस्ते खणून ठेवले असून बांधकामाचे साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहराच्या सर्वच भागात असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

वसई विरार शहरात सध्या विविध कामे सुरू आहे. त्यात जलवाहिन्या अंधरणे, रस्त्यांची डागडुजी, नवीन रस्ते तयार करणे, नाल्यांचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे. यासाठी रस्ते खणण्यात आलेले आहेत तर अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. या कामासाठी लागणारे साहित्य रस्त्यावर पडले आहे. रस्ते खणल्यानंतर तयार झालेला राडारोडा, मातीचे ढिगारे, खडी तशीच ठेवण्यात आलेली आहेत. जी कामे करण्यात आली आहे तेथे ठेकेदाराने खडी,माती इतर भंगार साहित्य तसेच ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. खडी रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वारा घसरत आहे यामुळे मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे. रस्ते आणि नाल्यांच्या अर्धवट कामांमुळे अनेक वाहतूक कोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. दिवाणमान येथे एका नाल्याचे काम सुरू आहे. दिड महिना होऊन गेला तरी काम पूर्ण झालेले नाही आणि रस्ता बंद आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना वळसा घालून जावे लागते.

दिवाणमान येथे असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर (पीटर कॉलेज) महाविद्यालयात येणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. येथे वळसा घालून येण्यासाठी रिक्षा जादा भाडे आकारतात. रस्ता बंद असल्याने आम्हाला दुसर्‍या मार्गाने भर उन्हात चालत जावे लागते अशी प्रियांका गोस्वामी या महाविद्यालयीन विद्यार्थीनीने सांगितले.

नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग येथे रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. तेथील माजी नगरसेक पंकज पाटील यांनी ते काम बंद पाडले होते. मात्र आश्वासन देऊनही ठेकेदाराने खड्डे भरण्याचे काम केलेले नाही.

रस्ता पूर्ववत करण्याची मागणी

जलवाहिन्या टाकण्यासाठी चांगल्या स्थितीत असलेले रस्ते खणून ठेवण्यात आले आहेत. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर तो रस्ता अर्धवट केवळ खडी आणि माती टाकून सुरू केलेला आहे. यामुळे चांगल्या रस्त्या खराब झाला आहे. ठेकेदाराने हा रस्ता पूर्ण करणे गरजेचे होते मात्र त्याने तो रस्ता पूर्ण केलेला नाही, असे शिवसेेच्या (ठाकरे गट) अतुल मोटे यांनी सांगितले. मुळात काम करताना किती कालावधी लागेल, कोण ठेकेदार काम करतोय त्याची माहिती फलक लावणे अनिवार्य असते परंतु असे फलक लावण्यात आलेले नाही असे आगरी कोळी सेनेचे भूपेश कडुलकर यांनी सांगितले. पालिकेकडे तक्रारी करूनही काहीच कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.