वसई: नालासोपारा पूर्वेच्या परिसरात रस्त्यावरील खड्डे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेशिस्तपणे चालविली जाणारी वाहने  यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे.त्यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या कायम असून याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. विशेषतः सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमानी नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.

नालासोपारा पूर्वेच्या भागातून महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिकच वाढली असून या भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अजूनही पालिकेकडून हव्या त्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज, संतोषभवन, वालईपाडा, धानिव बाग या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. 

मागील काही दिवसांपासून संतोष भवन ते पेट्रोल पंप परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. दररोज तासंतास प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मध्येच वाहने उभी करतात, याशिवाय विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, काही बेशिस्त रिक्षाचालक मध्येच वाहने टाकतात त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक होत असते असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. 

वाहतूक कोंडीचा समस्येमुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांनी थेट पायी प्रवास करून रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. यासाठी वाहतूक विभागाने जे बेशिस्त पणे वाहने चालवितात त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. व या भागात वाहतूक पोलीस नियुक्त करून वाहतूक नियंत्रित करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. रस्त्यालगत वाहने उभी असतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र चारचाकी वाहन टोइंग करण्याचे वाहन नसल्याने त्या हटविण्यास अडचणी आहेत असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

नालासोपाऱ्यात वाहतूक कोंडी होते त्याठिकाणी अंमलदार वाढवून नियंत्रण केले जाईल. याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी कारवाई सुद्धा केली जाईल.

प्रशांत लांगी, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ २

रस्ते सुधारणा करा 

नालासोपारा पूर्वेच्या भागातून महामार्गाला जोडणारा रस्त्यावर विविध ठिकाणच्या भागात खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ता हा उंच सखल असा त्यामुळे येथून वाहनांचा वेग हा मंदावतो त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठी ज्या भागात दुरवस्था झालेला रस्ता आहे तिथे पालिकेने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अतिक्रमण हटविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

नालासोपारा पूर्वेच्या भागात मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी फेरीवाले, गॅरेज यासह इतर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यावर कारवाई करण्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र बनत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.