वसई: अर्नाळा येथील विसावा रिसॉर्ट मधील तरणतलावात बुडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरणतलावात पोहत असताना डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नालासोपारा येथे राहणार्या ५ मित्रांचा एक गट मंगळवारी अर्नाळ्याच्या नवापूर येथील विसावा रिसॉर्ट मध्ये सहलीसाठी आले होते. दुपारी सर्व जण पाण्यात पोहत होते. साडेतीनच्या सुमारास सत्येंद्र कुमार सरोज (२५) याने तरणतलावात पोहण्यासाठी उडी मारली. मात्र तो पाण्यातून वर आला नाही. त्याच्यासोबत असणार्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी तो जोरात श्वास घेत होता आणि काही वेळेतच बेशुद्ध झाला.
हेही वाचा : निवडणुक काळात मुंबईत घातपाताचा कट उधळला, गुन्हे शाखेकडून ९ पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त
त्याला उपचारासाठी अर्नाळा येथील महालक्ष्मी रुग्णालयात दाखल कण्यात आले. त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची प्रकृती अधिक खालावली आणि त्याला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ‘तरणतलावात पोहताना डोक्याला ईजा झाल्याने सत्येंद्रकुमार याचा मृत्यू झाला आहे.याप्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे’, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलिसांनी दिली.