वसई : अर्नाळा राजोडी रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून नवशी बसवंत (६५) असे मृत माहिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केली. शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास अर्नाळा राजोडी- सत्पाळा या रस्त्यावरून नवशी बसवंत (६५) आणि मथुरा दयात दोघी चालत निघाल्या होत्या. याच दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी (स्कॉर्पिओ) गाडीने धडक दिली. यात नवशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : शहरबात: वसईतील मच्छिमार उध्दवस्त होण्याचा धोका

या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने चालकाला मारहाण करत गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करून चालकाला ताब्यात घेतले. महिलेचा मृतदेह अर्नाळा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन विरारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी चालक कुलदीप मिश्रा याला अटक केली असून त्याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे. याचा पुढील तपास ही सुरू आहे असेही पाटील यांनी सांगितले आहे. मृत महिला नवशी या सत्पाळा नाका ग्रामपंचायत कार्यालयामागे राहत होती. मुळची ही महिला डहाणू तालुक्यातील मुरबाड पोस्ट वैती येथील असून पोटाची खळगी भरण्यासाठी ती वेठबिगारी मजूर म्हणून काम करण्यासाठी वसईत आली होती.