वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर छुप्या मार्गाने होणारी लाखोंची खैर तस्करी उघड करण्यात भाताणे वन विभागाला यश आले आहे. गुरुवारी पहाटे ही कारवाई करत खैराचे ओंडके व वाहन असा ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुजरात राज्यातून मुंबई-अहमदाबाद महामार्गाने खैर लाकडांची छुप्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती भाताणे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन गुरुवारी पहाटे खानिवडे टोल नाक्यावर सापळा रचला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वसई विरार शहरात चार्जिंग केंद्र उभारणार

पहाटे पाचच्या सुमारास खैर लाकडांची अवैध वाहतूक करणाऱ्या टाटा ट्रकला त्यांनी अडविले. यावेळी अंधार असल्याने अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक महामार्गालगत बाजूच्या जंगलात फरार झाला असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. यात वाहनाची तपासणी केली असता यात खैर लाकडाचे ओंडके असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईत १५ लाखांचे खैर ओंडके व बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भाताणे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे, वनपरिमंडळ अधिकारी नितीन खुळपे, अनिल पाटील, वनरक्षक राहुल धानमेहेर, लक्ष्मण टिकेकर, वैभव पाटील, संदीप गायकवाड, चंदन खानिवडेकर, गुण्या माळी यांनी केली आहे.