वसई : वसईतील एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांनी दु:खातून सावरून डोळे आणि त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला आणि ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
वसई पश्चिमेच्या मानव मंदिर येथे राहणारे मनन जयेश मेहता ( ३५) हे लेखापाल म्हणून काम करतात. ३ महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुःखद प्रसंगातही मनन यांच्या पत्नी आणि आईने विलक्षण धैर्य व सामाजिक जाणिवेचा परिचय देत नेत्रदान आणि त्वचादानाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे मार्गदर्शक अशोकभाई ग्रोवर, डॉ. वरुण दोषी आणि संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी मेहता यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार दिला आणि अवयव दान प्रक्रियेत आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन केले. यानंतर नेत्रदान डॉ. अवधेश के. मिश्रा आणि मनीष पांडे यांनी संकलित केले. त्वचादान ज्ञानेश्वर शिंदे आणि यांच्या टिमच्या वतीने पार पडले. अशोकभाई ग्रोवर, ऱिध्दीविनायक रुग्णालयाचे सागर वाघ आणि डॉ. वरुण दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. त्यांच्या या निर्णयामुळे मनन यांच्या अस्तित्वाचा प्रकाश दृष्टी रूपाने कुणाच्या तरी डोळ्यांत चमकेल आणि स्पर्श कुणाच्या तरी आयुष्यात नवसंजीवनी देईल, असे दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे संस्थापक पुरूषोत्तम पवार यांनी सांगितले.
आपली ओळख जन्मापुरती मर्यादित नसते. आपण आयुष्यात समाजासाठी काही चांगले कार्य करून गेलो, तर आपले अस्तित्व कायमस्वरूपी कुणाच्या तरी डोळ्यांत प्रकाश बनून चमकते. जीवन संपले तरीही अवयवदानाद्वारे अमरत्व मिळू शकते. मनन मेहता यांच्या उदात्त दानाने हेच अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले.
अवयवदान चळवळीचे यश
गेल्या काही वर्षांपासून वसई विरार मध्ये देहमुक्ती फाऊंडेशनतर्फे अवयव दानासंदर्भात जनजागृती करून चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर यश येत आहे. पालघर जिल्ह्यातील एकाही रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपणाची मंजूरी नव्हती. त्यामुळे कुणाला अवयवदान करायचे असेल तर मुंबईतील रुग्णालयात करावे लागत होते. नालासोपारा येथील रिध्दीविनायक रुग्णालयाला नुकतीच शासनाकडून अवयवदान प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाली. मेंदूमृत (ब्रेन डेड) महिलेच्या अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया या रुग्णालयात यशस्वी झाली असून त्यामुळे ६ जणांना नवसंजीवनी मिळाली.