भाईंदर : घरात पाळलेल्या दोन मांजरी आणि सरडा यांचा विरहाच्या भीतीने नैराश्यात गेलेल्या मिरा रोड मधील २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनिस कुरेशी असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पाळलेले प्राणी त्याचे कुटुंबिय घरातून बाहेर काढणार होते. त्यामुळे अनिस नैराश्यात गेला होता.
मिरा रोडच्या नया नगर येथे अनिस आपल्या कुटुंबियांसोबत रहात होता. तो एका बेकरीत काम करत होता. त्याला लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. त्याने आपल्या घरात दोन मांजरी आणि ईलवाना प्रजातीचा सरडा पाळला होता. मात्र या प्राण्यांमुळे घरात अस्वच्छता व्हायची. सरडा पाळणे कुटुंबियांना आवडत नव्हते. ते सतत त्याला प्राणी पाळू नको असे सांगत होते. परंतु त्याकडे तो दुर्लक्ष करत होता. या प्राण्यांची तो काळजी घ्यायचा. मात्र त्याच्या कुटुंबियांना अनिसचा विरोध डावलून या मांजरी आणि सरड्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आपण प्रेमाने पाळलेले प्राणी आपल्यापासून दूर जातील या भीतीने तो नैराश्यात गेला होता. याच नैराश्यातून त्याने दुपारी घरात कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निखिल मोरे यांनी दिली.
हेही वाचा : Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
…प्राणी प्रेमामुळे लग्नालाही नकार
अनिसला लहानपणापासूनच प्राणी आणि पक्ष्यांवर प्रेम होते. लहानपणी पक्षी आणि मासे पाळले होते. सध्या त्याच्याकडे दोन मांजर आणि ईलवाना प्रजातीचा सरडा होता. त्याला आणखी प्राणी पाळायचे होते. काही महिन्यापूर्वीच त्याची बेकरीतील नोकरी सुटली होती. यावेळी आपला संपूर्ण वेळ तो या पाळीव प्राण्यांसोबत घालवत होता. तुझ्या होणार्या बायकोला प्राणी आवडणार नाही, अशी भीती त्याचे कुटुंबिय घालत होते. त्यामुळे तो तो लग्नालाही नकार देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.