वसई: चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेला एक तरुण यूट्युबर असल्याचे उघड झाले आहे. राहुल तायडे (२०) असे या आरोपीचे नाव आहे. तो यूट्यूबवर पंखा फास्ट नावाने आपल्या गाण्याचे चॅनल चालवतो. नशेसाठी त्याने चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील आठवड्यात २१ मे रोजी वसईच्या अंबाडी रोड येथील अकबर अली ट्रॅव्हल ऑफ इंडिया या कंपनीच्या कार्यालयात चोरी झाली होती. अज्ञात चोराने कार्यालयाचे शटर तोडून रोख रकमेसह पावणे दोन लाखांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने राहुल तायडेसह एका अल्पवयीन आरोपीला अटक केली.
हेही वाचा : वसई: वर्सोवा पुलाजवळ सुर्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामा दरम्यान भूस्खलन, पोकलेन सह चालक ढिगाऱ्याखाली अडकला
त्यातील राहुल तायडे हा यूट्युबर आहे. पंखा फास्ट या नावाने तो यूट्यूबवर चॅनल चालवतो. तो रॅप गाणी बनवतो आणि त्याचे हजारो फॅन्स (चाहते) यू ट्यूबवर आहेत. मात्र केवळ नशेसाठी त्याने ही चोरी केल्याचे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले. त्याने आणखी कुठे चोर्या केल्या आहेत का त्याचा तपास पोलीस करत आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, शैलेश पाटील, शामेश चंदनशीवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कादे आदींच्या पथकाने या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावला.