वसई : दहावीची परिक्षा तोंडावर आली असून पालक मुलांना अभ्यास कर म्हणून मागे तगादा लावत असतात. यामुळे मुले बर्‍याचदा वैतागत असतात. आई वडिलांच्या अशाच तगाद्याला कंटाळून एका दहावीच्या मुलीने घर सोडून पलायन केले. ती थेट उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथील एका आश्रमात जाऊन सत्संगात रमली होती. विरार पोलिसांनी या मुलीला शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार पुर्वेला राहणारी १५ वर्षांची मुलगी १ फेब्रुवारी रोजी घरातून पळून गेली होती. तिच्या सर्वत्र शोध घेतल्यानंतर पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता. ती कुणाच्याच संपर्कात नसल्याने तिचे अपहऱण केल्याची शक्यता होती. तिच्या मोबाईलचा माग काढून पोलीस तिचा शोध घेत होते. दरम्यान, ती उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश या धार्मिक स्थळी असल्याचे पोलिसांना समजले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोलनकर, पोलीस हवालदार मंदार दळवी आणि महिला पोलीस शिपाई वर्षा निकम यांनी ऋषिकेश येथे जाऊन तिचा शोध घेतला. पोलिसांनी तेथील आश्रम पालथे घातले आणि एका आश्रमात मुलगी आढळून आली. तिला पोलिसांनी उत्तराखंडावरून आणून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

हेही वाचा…वसई किल्ला ते भाईंदर रो रो सेवेचे उदघाटन रद्द; उत्साही प्रवाशांचा हिरमोड

ही मुलगी दहावीला होती. ती अभ्यास करत नसल्याने पालक तिला रागावत होते. त्यामुळे तिने वैतागून घर सोडले. कुठे जायचे हे माहित नव्हते. ती टिव्हीवरील धार्मिक वाहिन्यांपासून उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे अनेक आश्रम असून तिथे राहण्याची आणि जेवणाची सोय होते हे तिला माहिती होते. त्यामुळे ती एकटी ट्रेनने तिथे पोहोचले. सकाळ संध्याकाळी ती भजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमात भाग घेत होती, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोलनकर यांनी सांगितले.

हेही वाचा…विश्लेषण : मुंबई लोकलचे मोटरमन असंतुष्ट का आहेत? कोणत्या कारवाईची सतत भीती?

घरात खेळकर वातावरण ठेवा

सध्या दहावीच्या परिक्षेला काहीच दिवस उरले असल्याने मुलं खूप तणावात असतात. त्यामुळे घरात खेळकर वातावरण ठेवा मुलांशी सुसंसवाद ठेवा असे जाणीव संस्थेचे समन्वयक आणि समुपदेशक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले. दहावीच्या मुलांप्रमाणे पालकही तणावात असतात. मुलांना नैसर्गिक पध्दतीने अभ्यास करू द्या. त्यांच्या कलाने बोलत रहा. अन्यथा मुले घर सोडून जाण्याचे किंवा अन्य आत्मघातकी पाऊल उचलू शकतात असे शिक्षिका आणि समुपदेशक संध्या सोंडे यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In virar parents were angry over study girl ran away from home and reach uttarakhand rescued psg