वसई : मंगळवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या विरार जवळ सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली होती. विरार आणि चर्चगेटच्या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा बंद होत्या. यामुळे मुंबईवरून घरी परतणार्या प्रवाशांचे मात्र हाल झाले. मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वेस्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. यामुळे वसई- विरार दरम्यानची उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवा एक तास विस्कळीत झाली होती.
हेही वाचा : फसवणूक करून आलिशान वाहनांची चोरी; फरार ठकसेनांची टोळी ४ महिन्यांनी गजाआड
विरारच्या दिशेने जाणार्या तसेच चर्चगेटच्या दिशेने जाणार्या दोन्ही मार्गावरील उपनगरीय लोकल ट्रेन बंद झाल्या होत्या. यामुळे मुंबईहून घरी परतणार्या प्रवाशांचे हाल झाले. अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत आपले घर गाठले. विरार, नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलिासांनी फलाटावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला होता. संध्याकाळी ६ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर केल्यानंतर लोकल सेवा सुरळीत सुरू झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्यांनी सांगितले. मात्र ट्रेन नियमित नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.