वसई : मित्राच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीणीवर एका इमसाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे. या तिन्ही मुली अल्पवयीन असून त्यातील दोन मुली या सख्ख्या बहिणी आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. आरोपी कमलाकर कदम (४५) हा विरार मध्ये राहतो. त्याचा मित्र तुरुंगात होता. त्या मित्राने आपल्या पत्नी आणि १७ वर्षीय मुलीचा सांभाळ करण्याची विनंती केली. त्यानुसार कदम तुरुंगात असलेल्या मित्राच्या पत्नी आणि मुलीला आपल्या घरी आश्रय दिला होता. दरम्यान, मुलीची आई घर सोडून गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच राहिली. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी कदम याने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरवात केली.
मुलगी असहाय्य होती आणि आरोपी कदम याच्या धमकीमुळे ती गप्प बसली होती. दरम्यान, डिसेंबर मध्ये या पीडित मुलीच्या शेजारी एक कुटुंब राहण्यासाठी आले. त्यांच्या १३ वर्षांच्या दोन मुली होत्या. त्या मुलींची ओळख या पीडित मुलीशी झाली आणि घरी येजा सुरू झाली. आरोपी कदम याची या मुलींवर नजर पडली. ३१ डिसेंबरच्या रात्री आरोपीने आपल्या घरी एका मेजवानीचे (पार्टी) आयोजन केले आणि या दोन्ही मुलींनाही घरी बोलावले. त्यांना मद्य पाजून आरोपी कदम याने यो दोन्ही बहिणींवरही बलात्कार केला. मागील दिड महिन्यापासून हा प्रकार सुरू होता, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली.
याप्रकरणी सोमवारी १३ वर्षाच्या मुलीने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विरार पोलिसांनी आरोपी कमलाकर कदम याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) (एम) ६५ (१) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर यांनी दिली.