देशी मद्याच्या विक्रीत २१.९९ टक्के घट

प्रसेनजीत इंगळे

विरार :  पालघर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेने मद्यविक्रीत मोठी वाढ बघायला मिळाली आहे. सन एप्रिल २०२० ते सन २०२१ नोव्हेंबपर्यंतच्या  मिळालेल्या माहितीनुसार  विदेशी मद्य विक्रीत ९.५३, बिअर १७.२८ टक्के तर वाइन विक्रीत २०.९२ टक्के वाढ झाली आहे. यात देशी मद्याच्या विक्रीत मात्र २१. ९९ टक्के घट पाहायला मिळाली आहे. या वर्षी वाइनप्रेमींच्या संख्येत वाढ झाली आहे.

गतवर्षांला निरोप देण्यासाठी थर्टी फस्र्टसाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. अनेकांनी आपले बेत आखण्यास सुरुवात केली आहे. तर मद्याच्या दुकानावर आतापासून रांगा लागत आहेत. या वर्षीसुद्धा मोठय़ा प्रमाणात मद्याची विक्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी या वर्षी मागील वर्षांच्या तुलनेत मद्यविक्रीचा आलेख चढत्या क्रमाने वाढला आहे. तर देशी मद्याकडे मद्यप्रेमींनी पाठ फिरवली आहे. विशेषत: पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने गावठी दारूवर कारवाई केली जात असल्याने या मद्याच्या विक्रीला घट आली आहे. तर दुसरीकडे विदेशी मद्यावर शासनाकडून कर सवलत दिल्याने यात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

सन २०२० मध्ये ३९ लाख ३१ हजार ७६६ लिटर विदेशी मद्याची विक्री झाली तर २०२१ मध्ये यात ३ लाख ७४ हजार ७७९ लिटर ने वाढ होत एकूण विक्री ४३ लाख ६ हजार ५४५ लिटर झाली आहे. तर २०२० मध्ये बियर या मद्याची ८१ लाख ६० हजार २२ लिटर विक्री झाली होती. ती २०२१ मध्ये १४ लाख १० हजार ६२ लिटरने वाढ होऊन एकूण नोव्हेंबर महिन्यापर्यंत ९५ लाख ७० हजार ८४ लिटर विक्री झाली तर वाईन या मद्याची २०२० मध्ये १ लाख ८९ हजार ५६८ लिटर विक्री झाली होती. तर २०२१ मध्ये ३९ हजार ६५२ लिटरने वाढ होत एकूण विक्री २ लाख २९ हजार २२० लिटर विक्री झाली आहे. देशी मद्य सोडता इतर सर्व मद्य प्रकारात या वर्षी मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी करोना टाळेबंदी असल्याने एप्रिल महिन्यात कोणतीही विक्री झाली नाही. पण २०२१ मध्ये करोना निर्बंध कमी झाल्याने १०० टक्के विक्री झाली असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसाच्या अवधीवर थर्टी फर्स्टचा उत्सव येऊन ठेपला आहे. या वेळी मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे.    

Story img Loader