वसई: पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात नवीन वाहने खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. यंदाच्या वर्षात ९६ हजार ३०९ इतकी वाहने दाखल झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत १२ हजाराहून अधिक वाहनांची वाढ झाली आहे.मागील काही वर्षात शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यापाठोपाठ वाहन खरेदी करण्याचे प्रमाण ही वाढू लागले आहे. यापूर्वी नागरिक केवळ सणाच्या निमित्ताने वाहन खरेदी केली जात होती. आता मात्र वाहन हे प्रत्येक माणसाची गरज बनली असल्याने एरवी सुद्धा वाहन खरेदी कडे कल वाढू लागला आहे.जी काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आहे ती अपुरे आहे. त्यामुळे अनेकांना ऑटोरिक्षा किंवा बस पकडण्यासाठी रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे नागरिक खासगी वाहने खरेदीकडे वळले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यापूर्वी जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये ८४ हजार २६६ वाहने दाखल झाली होती. यावर्षीच्या २०२४-२५ या वर्षात परिवहन विभागात ९६ हजार ३०९ इतक्या वाहनांची नोंदणी झाली असून यात सर्वाधिक दुचाकी ७२ हजार १४३, मोटार कार १० हजार ५२०, ऑटोरिक्षा ४ हजार २६१, मालवाहतूक ५ हजार ७०१, कॅब २ हजार १६४, रुग्णवाहिका ४५ व इतर १ हजार ४७५ या वाहनांचा समावेश आहे.मागील वर्षीच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत १२ हजार ४३ ने वाढ झाली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वाहनांची खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या कार्यालयात नोंदणीसाठी  वाहनधारक येतात. आता वाहनधारकांना होणारा त्रास व विलंब टाळण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने बहुतांश वाहनांची नोंदणी ऑनलाइन स्वरूपात होत असतात असे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

रस्ते अरुंद , वाहनतळ ही नाही

शहरात दिवसाला सरासरी विचार केला असता प्रतिदिन अडीचशेहून अधिक नवीन वाहने रस्त्यावर येतात.

सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात एकूण  ८ लाख ७५ हजाराहून अधिक वाहनांची नोंद परिवहन विभागाकडे आहे.

वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. अनेक भागात रस्ते अपुरे आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

पालिकेकडून वाहने उभी करायला पार्किंग झोन केले जाणार होते. ते सुद्धा अजूनही कागदावर असल्याने वाढती वाहने शहराची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

बेकायदेशीर पार्किंगमुळे कोंडी.

बेकायदेशीर पार्किंग व फेरीवाले यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांची कोंडी होऊ लागली आहे.शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी व नियोजन व्हावे यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने वाहतूक धोरण निश्चित केले होते. यात वसई विरार मधील २१५ ठिकाणे निश्चित केली होती. त्यासाठी विविध ठिकाणी पार्किंग नो पार्किंग सूचना फलक, दिशा दर्शक फलक लावले जाणार होते. यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र अजूनही शहरात फलक लागले नसल्याने बेकायदेशीर पार्किंगची समस्या वाढू लागली आहे.

मागील पाच वर्षातील आकडेवारी

वर्ष                      वाहन संख्या 

२०२०-२१     –       ५४ हजार ४९७

२०२१-२२   –         ५५ हजार ८७६

२०२२- २३  –         ७४ हजार ६११

२०२३-२४-    ८४ हजार २६६

२०२४- २५ –   ९६ हजार ३०९