तक्रारी सोडविण्यासाठी ‘भरोसा’ कक्ष स्थापन करणार
वसई: टाळेबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महिलांच्या तक्रारी सामोपचाराने मिटविण्यासाठी वसई विरार आणि मीरा-भाईंदर शहरात भरोसा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कक्षात प्रामुख्याने महिलांशी संबंधित तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. त्यातील सर्व अधिकारी महिला असणार आहेत.
मागील वर्षी आलेल्या करोनाच्या संसर्गामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे सर्वजण घरातून काम करत होते. याचा विपरित परिणाम दिसून आला. पती-पत्नी सतत घरात असल्याने कौटुंबिक कलहामंध्ये वाढ झाली आणि अनेक प्रकरणात गोष्टी या घटस्फोटापर्यंत जाऊ लागल्या आहेत. पत्नी पत्नीचे वाद, सासरच्या मंडळीकडून त्रास, महिलांवरील इतर अत्याचार वाढू लागले. मागील वर्षांच्या तुलनेत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये १०८ ने वाढ झाली आहे. यामुळे पोलिसांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी भरोसा कक्ष (सेल) स्थापन करण्याची संकल्पना मांडली आहे. कौटुंबिक कलह थेट कायद्याने न सोडविता सामोपचाराने कसे सोडविता येईल यावर हा कक्ष काम करणार आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील (गुन्हे) यांनी सांगितले की, प्रत्येक पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांच्या तक्रारी या भरोसा कक्षाकडे पाठविल्या जातील. कक्षामध्ये महिला पोलीस अधिकारी, समुपदेशक, मानसोपचारतज्ञ तसेच वकिलांचा समावेश असणार आहे. महिलांच्या समस्या समजावून सामोपचाराने वाद मिटविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात आलेली तक्रार या भरोसा कक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. महिलांनतर विधिसंघर्ष बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या देखील या भरोसा कक्षामार्फत सोडविल्या जाणार आहेत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
दोन भरोसा कक्ष
पोलीस आयुक्तालयात वसई विरार शहरातील दोन परिमंडळासाठी एक आणि मीरा भाईंदर मधील परिमंडळासाठी एक असे एकूण दोन भरोसा कक्ष स्थापन केले जाणार आहेत. त्यात १ महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक, ३ महिला कर्मचारी आणि १ पुरूष कर्मचारी आणि इतर समुपदेशक यांचा समावेश असणार आहे.