वर्षभरात १८ हजारांहून अधिक घटना
कल्पेश भोईर
वसई: वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढल्याने श्वान दंशाच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात शहरांत १८ हजार ८९० इतक्या श्वान दंश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याआधीच्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण २ हजार ६५३ ने वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. घराजवळ खेळणाऱ्या लहानग्यांचे लचके तोडणे, रात्रीच्यावेळी चालत येणाऱ्या नागरिकांवर, दुचाकीस्वारांवर श्वानांनी हल्ला करण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झालेली आहे. हे श्वान टोळीने वावरत असल्याने दहशत आणखीच वाढली आहे. नुकतेच अर्नाळा समुद्रकिनारी सातवर्षीय मुलावर श्वानांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
सन २०२१ मध्ये वसई विरारमध्ये १८ हजार ८९० इतक्या श्वान दंशाच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२० मध्ये १६ हजार २३७ इतक्या श्वान दंशाच्या घटना घडल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २ हजार ६५३ ने यात वाढ झाली आहे. या वाढत्या घटनांचा विचार करता दिवसाला सरासरी ५० ते ५२ घटना तर महिन्याला सरासरी दीड हजारांहून अधिक घटना घडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भटक्या श्वानांना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या निर्बीजीकेंद्रामार्फत प्रयत्न होणे गरजेचे आहे. ते होत नसल्याने श्वानांची संख्या वाढली आहे. पादचाऱ्यांच्या हातात पिशवी दिसली की श्वान हल्ला करतात, पाठलाग करतात. अचानक चावाही घेतात. काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर वाहनचालकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यांना वाचवण्याच्या नादात भीषण अपघात घडण्याची भीती नागरिकांनी, वाहनचालकांनी बोलून दाखवली आहे.
श्वान निर्बीजीकरण केंद्रे रखडली
वसई पूर्वेच्या नवघर येथे पालिकेचे एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. मागील वर्षी पालिकेने या केंद्राची क्षमता वाढवून भटक्या श्वानांना लस देऊन निर्बीजीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. पण श्वानांची संख्या पाहता अधिक निर्बीजीकरण केंद्रे आवश्यक आहेत. त्यासाठी चंदनसार व नालासोपारा येथील निर्मळ येथे जागा प्रस्तावित केल्या होत्या. परंतु अजूनही नवीन केंद्र तयार झालेले नाही.