भाईंदर : राज्यातील राजकारणात वारकरी संप्रदायातील आमदार विधिमंडळात घेणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केले. मीरा-भाईंदरमध्ये राज्यातील पहिले वारकरी भवन उभारण्यात येत आहे. गुरुवारी त्याचे भूमिपूजन झाले.
दहिसर टोल नाक्याजवळ असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर वारकरी भवन उभारण्यात येत आहे. गुरुवारी या भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम कीर्तनकर निवृत्ती देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी इंदुरीकरांच्या कीर्तनाचा विशेष कार्यक्रम नाटय़गृहात पालिका प्रशासनाने आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने नागरिकांनी नाटय़गृहात उपस्थिती दर्शवली होती. आपल्या भाषणात इंदुरीकरांनी राज्यातील परिस्थिती पाहता पदवीधर आमदाराप्रमाणे राज्य शासनाने किमान एक तरी वारकरी संप्रदायातील आमदार विधिमंडळात घ्यावा, अशी जाहीर मागणी केली. संतसाहित्य हे विद्यार्थाच्या अभ्यासक्रमात आणणे ही काळाची गरज असून त्यामुळे आदर्श समाज तयार करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन आणि आयुक्त दिलीप ढोले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
एक मजली वारकरी भवन
मीरा रोड येथे तयार होणाऱ्या वारकरी भवनाला पालिकेने संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन असे नाव दिले आहे. विकासकाला विकास हक्क प्रमाणपत्र (टीडीआर) देऊन हे भवन उभारले जाणार असल्याने पालिकेचा खर्च वाचणार आहे. हे भवन साधारण तळ अधिक एक मजली असणार असून यात एकूण २६४.४० चौ. मीटर इतके बांधकाम केले जाणार आहे. याशिवाय तितकाच परिसर वाहनतळ आणि उद्यानासाठी वापरला जाणार आहे. या भवनांची निर्मिती विकासकाला विकास हक्क प्रमाणपत्र देऊन केली जाणार असली तरी अंतर्गत सजावटीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षअखेपर्यंत या भवनाचे काम पूर्ण होणार असल्याचे पालिकेने सांगितले.