वसई विरारच्या औद्योगिक वसाहतीत सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम उद्योगांवर होऊन मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आता वसईतील उद्योग गुजरातला स्थलांतरणाच्या मार्गावर आहेत. वसई विरार शहरात गोलानी, रेंज ऑफिस, गावराईपाडा, नवघर, वालीव, पेल्हार, पोमण, सागपाडा, वसई फाटा, नालासोपारा फाटा, विरार फाटा, बापाणे या भागात जवळपास १५ हजाराहून अधिक  छोटे मोठे उद्योग कारखाने उभे आहेत. यात सुमारे पाच लाखाहून अधिक कामगारांना  रोजगार मिळाला असून औद्योगिक वसई अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे. परंतु हे उद्योग कारखाने सुरू ठेवण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. मात्र महावितरण कडून योग्य ते वीज वितरण नियोजन नसल्याने याचा फटका या उद्योगांना बसू लागला आहे.

मागील काही महिन्यांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहेत. दिवसातून दररोज चार ते पाच वेळा कोणत्या नकोणत्या कारणामुळे तरी वीज जाते. यामुळे कारखान्यातील कामकाज पूर्णतः ठप्प होत असते असे गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अशोक ग्रोवर यांनी सांगितले आहे. तर कधी कधी वीज पुरवठा उच्च व लघु अशा दाबाने ये जा करीत असल्याने कारखान्यातील महागड्या यंत्रात ही बिघाड होऊन मोठे नुकसान होऊ लागले आहे. महावितरणकडे  याबाबत वारंवार तक्रार करूनही यातून मार्ग काढला जात नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. महावितरण उद्योगांना स्थिर वीज देण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने मोठा फटका बसत आहे. या सततच्या समस्यांमुळे निराश झालेले अनेक उद्योग आता गुजरातमध्ये स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे.

हेही वाचा : वसईत ७१ अनधिकृत शाळा; ५८ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल

महावितरणला वीज पुरवठ्याच्या संदर्भात वारंवार तक्रारी करून झाल्या आहेत. सतत वीज जाते त्यामुळे येथील उद्योग चालणे मोठे कठीण झाले आहे.याबाबत महावितरणने नियोजन करून तोडगा काढावा अशी मागणी करीत आहोत.

अशोक कोलासो, उपाध्यक्ष गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशन

१) तत्कालीन मंत्र्यांनी दिलेली आश्वासने ठरली फोल

वसईतील औद्योगिक क्षेत्राचाही अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागत आहे. येथील औद्योगिक क्षेत्राची उन्नती व्हावी व येथील समस्या सुटाव्या यासाठी लोकसत्ताने घेतलेल्या वीज परिषदेत तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्योगांच्या वीज विषयक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले होते. त्यानंतर तत्कालीन केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ही वसईतील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी नेमून त्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र मंत्र्यांनी दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण झाली नसल्याने ही आश्वासने फोल ठरली आहेत.

हेही वाचा : ३२७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; अंडरवर्ल्डचा सहभाग, दाऊद इब्राहिमचा हस्तक मुख्य सूत्रधार

२) ऊर्जामंत्र्यांकडे संयुक्त बैठकीची मागणी

वसई विरार मधील वीज समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक यासह उद्योजक देखील त्रस्त झाले आहेत. ही समस्या सुटावी यासाठी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महावितरणचे व महापारेषणचे मुख्य अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, रहिवासी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे. या बैठकीतून वसई विरार मधील वीज समस्येवर तोडगा काढावा असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.