विरार : नालोसापारा येथील एका नवजात बालकावर उपचार करताना त्याचा हात गमावल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे ही घटना घडली असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळाच्या पालकांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नालासोपारा येथे राहणाऱ्या अंजली वाला हिने नालासोपारा येथील त्रिवेणी या खासगी रुग्णालयात ५ ऑक्टोबरला जुळय़ा मुलांना जन्म दिला होता. यातील एका बाळाची शुगर कमी असल्याचे सांगून डॉक्टरांनी सलाईन लावले. मात्र त्या सलाईनमुळे त्याचा उजवा हात काळा पडत गेला. मालीश केल्यावर ठिक होईल असे त्यांनी सांगितले. पण बाळाच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नसल्याने पालकांनी त्याला मुंबईच्या वाडिया रुग्णालयात नेले. यावेळी बाळाच्या हाताला गँगरिन झाल्याने बाळाचा हात कापण्यात आला. माझ्या बाळाची प्रकृती चांगली होती. डॉक्टरांनी बाळाला चुकीच्या पध्दतीने सलाईन लावले आणि त्यामुळे बाळाचा हात कापावा लागला असा आरोप अंजली वाला यांनी केला. या प्रकऱणी  पालकांनी पोलीस ठाणे, महापालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत,

हेही वाचा >>>‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी

या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करून अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉक्टर संजय बोदाडे यांनी दिली. या प्रकरणात जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवाल आल्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. चुकीच्या उपचारांचा आरोप रुग्णालयाने फेटाळला आहे. बाळावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, पण पालकांनी त्याला इतर रुग्णालयात नेले. त्यामुळे तेथे काय झाले सांगता येणार नसल्याचे रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ. अतुल पारसकर यांनी सांगितले.