भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोनाचा प्रसार झपाटय़ाने वाढत असताना आता करोनाचा शिराकाव पालिका मुख्यालयात झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांसह पाच मुख्य अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवडय़ापासून मीरा-भाईंदर शहरात करोनाचा प्रसार जलद गतीने होऊ लागला आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्याकरिता प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्याकडे भर देण्यात येत आहे. यात कोविडबाधितांना शोधून काढून त्यांचे तातडीने विलगीकरण करुन कोविडची साखळी तोडण्यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी ठिकठिकाणी रॅपिड अॅन्टीजन टेस्टसह आरटी-पीसीआर टेस्ट मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी पालिका मुख्यालयात कोविड चाचणीची मोहीम राबविण्यात आली असता त्यात अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, साहाय्यक आयुक्त संजय दोंदे, पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता शरद नानेगावकर, किरण राठोड, शिपाई विश्वनाथ पाटील, भूषण पाटील यांच्यासह आणखी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविडचा संसर्ग झाल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
३६ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील तब्बल ३६ पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.यात १० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून २६ इतर पोलिस कर्मचारी असल्याची माहिती आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी बलराम पालकर यांनी दिली.
आमदारांना करोनाची बाधा
मीरा- भाईंदर शहरातील शिवसेना पक्षाचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सरनाईक यांना सध्या तरी करोनाची सौम्य लक्षणे असून ते गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर सरनाईकांसह त्यांच्या स्वीय सहायकांचा अहवालदेखील सकारात्मक असल्यामुळे संपर्कात आलेल्या नागरिकांना करोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांच्या कार्यातून करण्यात आले आहे.