विरार : मागील काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत असताना आता या महागाईची झळ रस्त्यावरील खाद्यपदार्थानासुद्धा बसायला लागली आहे. खाद्यतेल आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर आवाकाच्या बाहेर जात असल्याने वडापाव, समोसा, इडली, डोसा, मिसळ अशा नियमित खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाचे दर ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत.
मुंबई आणि आसपासच्या उपनगरात अनेक नागरिक कधी भुकेसाठी, कधी चवीसाठी तर कधी निव्वळ मजेसाठी वडापावचे सेवन करतात, सध्या अनेक कामाच्या ठिकाणी सकाळी नास्त्यासाठी इडली डोसा, मिसळ, समोसे स्वस्त असल्याने चवीने खाल्ले जातात, तर टपरीवरील चहा तर चवीने घेतला जातो. पण आता यासाठी सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
विरार येथील वडापाव व्यावसायिक दीपक शिर्के यांनी माहिती दिली की, तेल आणि सिलेंडरसह इतर वस्तूंचे दरसुद्धा वाढले आहेत. त्यात बेसन, बटाटे, मिरची, कोिथबीर, मसाले यांचे दरसुद्धा दुप्पट होत आहेत. तर पावसुद्धा महागला आहे. यामुळे १० ते १२ रुपयांत वडापाव विकणे शक्य होत नाही. यामुळे नाइलाजाने आम्हाला दरवाढ करावी लागत आहे. दरवाढ झाली तरी नागरिक सहकार्य करत असल्याने दिलासा आहे, पण वाढती महागाईमुळे अनेक रस्त्यावरील छोटे व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत.
तर ठाकुरजी चहाचे मालक दिनेश सिंग यांनी माहिती दिली की, दुधाचे प्रतिलिटर दर वाढले आहेत. त्यात चहा सातत्याने गरम करावा लागत असल्याने गॅस सिलेंडरचा वापर अधिक होत आहे. यामुळे उत्पन्न घटले आहे. लागत काढणे कठीण होत असल्याने दरवाढ होत आहे. आधी ५ ते ६ रुपयाला मिळणारा कटिंग चहा ७ ते १० रुपयावर गेला, तर फुल चहा १५ ते २० रुपयाला मिळत आहे. महागाईमुळे आधीच सामान्य नागरिकांचे हाल होत असताना भूक भागविण्याचे पर्याय असलेले स्वस्त पदार्थसुद्धा आता महागत असल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.
तेल, गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ
मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या आणि व्यावसायिक गॅस र्सिलिडरच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. पाम तेलसुद्धा १६० ते १८० रुपये लिटर तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २२०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यात कच्च्या मालाच्या किमतीसुद्धा त्याच गतीने वाढत आहेत. यामुळे आता रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या किमती वाढत आहेत. आधी १० ते १२ रुपयाला मिळणारा वडापाव १५ ते १८ रुपयांवर पोहोचला आहे. त्याच्यापाठोपाठ समोसा आणि इडली आणि मिसळ यांच्या दरातही प्लेटमागे ५ ते १० रुपयाची वाढ केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा