कल्पेश भोईर
वसई : समुद्रात वाढत असलेले प्रदूषण, भूगर्भ सर्वेक्षणादरम्यान केले जाणारे स्फोट, बेकायदा मार्गाने होणारी मासेमारी अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. याचाच परिणाम हा पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मासेमारीवर होत असून माशांची आवक कमी होऊ लागली आहे.
वसई पश्चिमेतील वसई कोळीवाडा, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा, पाचूबंदर, किल्ला बंदर यासह इतर भागांतून मोठय़ा संख्येने मच्छीमार हे बोटी घेऊन मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातात. मात्र मागील काही वर्षांपासून एकापाठोपाठ एक अशी संकटे उभी राहत असल्याने या मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय हा डबघाईला येऊ लागला आहे. समुद्रातील प्रदूषण वाढीस लागत आहे. तर दुसरीकडे तेलसाठे शोधण्यासाठी समुद्रात मागील काही वर्षांपासून भूगर्भ सर्वेक्षण सुरूच आहे. यामुळे अधूनमधून पाण्यात स्फोट घडवून आणले जात आहेत. याचा परिणाम हा समुद्रातील मत्स्यजीवांवर होऊ लागला आहे. त्यातच एलईडी व पर्सेसिनद्वारे मासेमारी करण्यास बंदी असतानाही त्यामार्फत बेकायदा मासेमारी होत आहे. याचा परिणाम पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर होऊ लागला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली आहे. मात्र पुरेशा प्रमाणात मासेच जाळय़ात येत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे. बोटींसाठी हजारो रुपयांचे इंधन लागते. बोट समुद्रात नेल्यावर मात्र मासळी हाताशी लागत नसल्याने पदरी निराशा पडू लागली आहे. माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत तर दुसरीकडे ज्या काही प्रजाती शिल्लक आहेत त्यांना वाढीसाठी विशिष्ट वेळ दिला जात नसल्याने समुद्रातील मासे कमी होत असल्याचे संजय कोळी यांनी सांगितले आहे. सुरुवातीला एका फेरीला ४० ते ५० टब इतकी मिळणाऱ्या मासळीचे प्रमाण हे ५ ते ६ टब इतके झाले आहे. पापलेट, सुरमई व इतर मासेही तुटपुंज्या स्वरूपात मिळत आहेत, असेही कोळी यांनी सांगितले आहे.
इंधन दरवाढीच्या झळा
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वच जण मेटाकुटीला आले आहेत. या वाढत्या इंधन दरवाढीचा फटका हा मच्छीमार बांधवांना बसू लागला आहे. बोटींना लागणारे डिझेल मच्छीमारांना १२४ रुपये प्रतिलिटरने घ्यावे लागत आहे. तेच इंधन इतरत्र १०२ रुपये लिटर आहे. त्यामुळे मच्छीमारांना बोटीसाठी जवळपास अधिकचे २० ते २२ रुपये मोजावे लागत आहेत. त्याच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे.
सरकारकडे आम्ही सातत्याने मच्छीमारांचे प्रश्न मांडत असतो. परंतु सरकार पारंपरिक मच्छीमारांची उन्नती व शाश्वत विकास याकडे लक्ष दिले जात नाही. विविध प्रकारच्या कारणांमुळे माशांची आवक घटली आहे. याचा परिणाम हा मच्छीमारांवर होऊ लागला आहे. शासनाने आता तरी जागे होऊन पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांवर लक्ष द्यावे. – संजय कोळी, वसई मच्छीमार सहकारी संघटना
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा