कल्पेश भोईर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई: प्रदूषण रोखण्यासाठी आता राज्य परिवहन मंडळाने देखील पुढाखारा घेतला असून आपल्या बसेस द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) वर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३०० बसेस एलएनजीवर धावणार आहेत. प्रोयोगिक तत्वावर ५ बसेस एलएनजीमध्ये रूपांतरित करण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> रेल्वे मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली; मिरा रोड रेल्वे स्थानाकावरील घटना

पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, सफाळे, जव्हार , पालघर असे महामंडळाचे आठ आगार आहेत. या आगारातून ग्रामीण, शहरी व इतर लांब व मध्यम पल्याच्या गाड्या सोडल्या जातात. सर्व आगारात मिळून ४३५ इतक्या एसटीच्या बसेस आहेत. यातील दिवसाला ३९० इतक्या बसेस सोडल्या जातात. यातून मोठ्या संख्येने प्रवासी करतात. आता एसटीच्या बसेस या डिझेल या इंधनावर चालतात. एसटीच्या गाड्यांना दररोज साधारणपणे २५ हजार लीटरहून अधिकचे इंधन (डिझेल) लागते. म्हणजेच दिवसाला २२ ते २३ लाख रुपये इंधनावर खर्च करावे लागत आहे. तर दुसरीकडे अनेक गाड्या जुन्या झाल्या असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात काळा धूर बाहेर पडतो यामुळे प्रदूषण होत असते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून डिझेल बसगाड्या द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील देखील यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

हेही वाचा >>> शहरबात :…तेव्हा सुद्धा प्रतिमा मलिन होत नाही का?

सुरवातीला प्रायोगिक तत्वावर पालघर विभागातून ५ डिझेल इंधन बस एलएनजी रूपांतर करण्यासाठी देण्यात आल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली आहे. त्यानंतर डिझेलवर चालणाऱ्या ३०० बसेस  एलएनजी मध्ये रूपांतर केल्या जातील. डिझेलऐवजी एलएनजी इंधनाच्या वापरामुळे तुलनेत प्रदूषणात  घट होण्यास मदत होईल व इंधनावर होणाऱ्या खर्चाची बचत होईल असेही जगताप यांनी सांगितले आहे.

वसई विरार महापालिकेच्या ई बसेसला विलंब वसई विरार महापालिकेच्या विद्युत बसेसला मात्र आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पालिका एकूण ५७ विद्युत बसेस खरेदी करणार असून त्याची एकूण किंमत ८१ कोटी २९ लाख रुपये एवढी आहे. पहिल्या टप्प्यात ४० बसेस दाखल होणार आहेत. मात्र बस खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. बस निविदा प्रक्रिया सुरू असून त्याला ७ महिन्यांचा विलंब लागणार असल्याचे सांगण्यात आले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Initiative of msrtc to prevent pollution to run buses on liquefied natural gas zws