वसई : फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची घटना वसईत घडली आहे. ईनोसंट रिबेलो असे या तरुणाचे नाव असून तो वसईच्या चुळणे गावात रहात होता. इनोसंटला कसलाही आजार नसताना अचानक खेळताना हृृदयविकाराचा झटका आला. सामाजिक कार्यात सक्रीय असणार्या इनोसंटच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
वसई पश्चिमेच्या चुळणे गावात राहणारा ईनोसंट रिबेलो (२७) हा तरुण नियमित फुटबॉल खेळायला जात होता. रविवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळायला गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात गेला होता.त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी आला. मात्र बरं वाटल्याने तो थोड्यावेळाने पुन्हा फुटबॉल खेळायला गेला. यावेळी मात्र तो मैदानातच कोसळला. त्याला त्वरीत बंगली येथील कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचारादम्यान संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा >>> पिंपरी : इंद्रायणी नदीत दोन जण बुडाले, गेल्या ४८ तासांपासून शोध मोहीम सुरूच…
बीएस्सी पर्यंत पदवी शिक्षण घेतलेला ईनोसंट एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. करोना नंतर ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने तो घरातून काम करायचा आणि आठवड्यातून एकदा नवी मुंबई येथील कंपनीच्या कार्यालयात जायचा. तो युवा जागृती सेवा संघाचा अध्यक्ष होता आणि विविध सामाजिक कार्यात भाग घेत होता. त्याचे आई वडिल शिक्षक आहे. वडिल चार्ल्स रिबेलो हे चुळणे गावचे माजी उपसरपंच आणि जागृती सेवा संघाचे माजी अध्यक्ष होते. अविवाहित असलेल्या ईनोसंटला एक भाऊ आहे.
हेही वाचा >>> वसई : पोलीस अकादमीमध्ये मुलींचं लैंगिक शोषण; रेल्वे पोलिसांमधील दोघांना अटक
त्याला कसलाही आजार नव्हता. तो एकदम मनमिळावून आणि उत्साही तरुण होता. विविध सामाजिक उपक्रमात तो हिरिहिरीने भाग घेत असे. वडिलांच्या समाज कार्याचा वारसा तो चालवत होता. त्याच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे, असे चुळणे गावातील राजेश घोन्साल्विस यांनी सांगितले. सोमवारी सकाळी चुळणे येथील फातिमा माता चर्च मध्ये शोकाकुल वातावरणात ईनोसंटच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.